टार्गेट किलिंगच्या संदर्भात जम्मू आणि काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) आधीच वातावरण चांगलेच तापले आहे. आणि अशातच आता जातीय तणाव लक्षात घेता, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी डोडा जिल्ह्यातील भदेरवाह शहरात फ्लॅग मार्च काढल्यानंतर कर्फ्यू लागू केला. आता प्रशासनाने भदेरवाहसह (Bhaderwah) किश्तवाड, डोडा आणि रामबनमध्येही इंटरनेट सेवा बंद केली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन करणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले आहे. (Curfew in Jammu and Kashmir)
स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरात जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, या पार्श्वभूमीवर जातीयदृष्ट्या संवेदनशील शहरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. त्याचबरोबर शांतता राखण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले असून खबरदारी म्हणून मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
वादग्रस्त पोस्टनंतर तणाव
नुपूर शर्माच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत जम्मूच्या भदेरवाह येथील मशिदीतून निवेदन जारी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे भदेरवाहात जातीय तेढ निर्माण झाली होती. त्यामुळे परिसरातील सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते.
आरोपींवर गुन्हा दाखल
ANI ने दिलेल्या माहितीनुसार, जम्मूतील भदेरवाह येथील मशिदीतून प्रक्षोभक घोषणा देणारा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या याबाबत अधिक तपास सुरू आहे. त्याचबरोबर कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा देत पोलिसांनी लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे.
यासोबतच भडकाऊ भाषण करणाऱ्या मौलवीविरुद्ध भदेरवाह पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 295-ए आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे.
नुपूर शर्माच्या अटकेची मागणी
भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून मुस्लिम समुदायाने भदेरवाह येथे बंदची हाक दिल्याचे सांगण्यात येत आहे.मुस्लीम समुदाय नुपूर शर्मा यांच्या अटकेची मागणी करत होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.