
भारतीय क्रिकेटमधील दोन महान खेळाडू म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा. गेली अनेक वर्ष या दोन्ही महान फलंदाजांनी भारताच्या कसोटी संघाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. विराट कोहलीच्या आक्रमक नेतृत्वशैलीमुळे भारतीय संघ जिंकण्याच्या वृत्तीने खेळायला लागला, तर रोहित शर्माच्या संयमी नेतृत्वाने संघाला स्थैर्य दिलं. त्यामुळं जेव्हा या दोघांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली, तेव्हा अनेकांना वाटलं की भारतीय कसोटी संघ अडचणीत येईल. चाहत्यांपासून ते काही माजी क्रिकेटपटूपर्यंत सर्वांच्या मनात एकच प्रश्न होता – रोहित आणि विराटशिवाय टीम इंडिया कसोटी क्रिकेटमध्ये किती दिवस टिकणार?
कोहली आणि रोहित यांचं संघातील योगदान केवळ धावा किंवा कर्णधार म्हणून घेतलेल्या निर्णयांपुरतं मर्यादित नव्हतं, तर त्यांनी संघाच्या मानसिकतेत परिवर्तन घडवलं होतं. त्यांनी एक ‘जिंकण्याची भूक’ तयार केली होती. कोहलीच्या काळात भारतीय संघाने परदेशात कसोटी विजय मिळवले, तर रोहितच्या नेतृत्वात संघ अधिक स्थिर वाटू लागला.
त्यांच्या अनुपस्थितीत, संघाचं नेतृत्व कोण करणार? कोण सलामीला येणार?दबावाखाली कोण खेळणार? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली की, आता भारताची कसोटी ताकद ढासळेल.
पण प्रत्यक्षात इंग्लंडविरुद्ध सुरू झालेल्या कसोटी मालिकेने या सर्व चिंता फोल ठरवल्या. रोहित-विराटशिवाय मैदानात उतरलेला भारतीय संघ नव्या दमाने खेळताना दिसला. विशेष म्हणजे, संघातील युवा खेळाडूंनी अशा प्रकारे कामगिरी केली की, त्यांनी फारशी अनुभव नसतानाही जबाबदारीने खेळ करत संघाला विजयाच्या मार्गावर नेलं.
यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, ऋषभ पंत या नव्या चेहऱ्यांनी कसोटी क्रिकेटमधील दमदार फलंदाजी बघून कोणीही म्हणेल की ही ‘नवीन टीम इंडिया’ तयार झाली आहे. यशस्वी जयस्वालची खेळी विशेष उल्लेखनीय आहे. सलामीला येताना त्याने इंग्लंडच्या आक्रमणासमोर संयम राखून, तंत्रशुद्ध फलंदाजी केली. दुसरीकडे, संघाची कमान सांभाळणाऱ्या शुभमन गिलने मधल्या फळीत महत्त्वपूर्ण भूमिका निभावत संघाला आवश्यक त्या वेळी धावांचं पाठबळ दिलं.
या दोघांच्या खेळीनं स्पष्ट झालं की त्यांच्याकडे केवळ प्रतिभा नाही, तर कसोटी खेळासाठी लागणारी मानसिक ताकदही आहे. विशेष म्हणजे, या खेळाडूंना आपल्या पहिल्याच कसोटीत मोठ्या अपेक्षांचं ओझं होतं, पण त्यांनी कोणतीही घाई न करता संयमी खेळ दाखवला.
गोलंदाजीच्या बाबतीतही भारतीय संघाने चोख कामगिरी केली. पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराहने आपल्या वेगवान गोलंदाजीने इंग्लंडच्या फलंदाजांना हैराण केलं. मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि प्रसिध्द कृष्णा यांनीही आपापल्या क्षमतेनुसार जबाबदारी पार पाडली. विशेष म्हणजे, एकाच सामन्यात फक्त एकाच गोलंदाजावर अवलंबून न राहता, संपूर्ण युनिटनं टीमवर्कच्या जोरावर विकेट्स घेतल्या. यामुळे संघाच्या चांगल्या कामगिरीत फक्त एकाच खेळाडूचं योगदान नव्हतं, तर प्रत्येकाने आपली भूमिका योग्य पद्धतीने बजावली होती.
या सर्व यशामागचं खरं कारण म्हणजे भारतीय संघाचा बदललेला दृष्टिकोन. पूर्वी संघाची कामगिरी अनेक वेळा काही ठराविक खेळाडूंवर अवलंबून असायची. पण आता 'टीम इंडिया' हा शब्द खरोखरच अर्थपूर्ण वाटतो. प्रत्येक जण जबाबदारी घेतोय, प्रत्येकजण संघासाठी खेळतोय, आणि त्यामुळेच एखाद्या मोठ्या नावाच्या अनुपस्थितीतही संघाची ताकद कमी वाटत नाही. हे केवळ खेळाडूंमधील गुणवत्ता नाही, तर संघ व्यवस्थापन आणि प्रशिक्षकांनी घेतलेल्या दूरदृष्टीपूर्ण निर्णयांचं फलित आहे.
या नव्या संघात आत्मविश्वास आहे, खेळावर नियंत्रण आहे आणि दबावाखाली खेळण्याची क्षमता आहे. इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध नव्या खेळाडूंनी जसा निर्धार दाखवला, तसा निर्धार काही वर्षांपूर्वी केवळ अनुभवी खेळाडूंमध्ये दिसत होता. आता मात्र ही नवीन पिढी तयार झाली आहे. विशेष म्हणजे, ही पिढी जुन्या खेळाडूंचं अनुकरण करत नाही, तर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करत आहे.
चाहत्यांचं मत देखील आता बदलू लागलं आहे. जे चाहत्यांनी सुरुवातीला रोहित-विराटशिवाय संघ 'कमकुवत' होईल असं मानलं होतं, तेच आता सोशल मीडियावर युवा खेळाडूंचं कौतुक करताना दिसत आहेत. जैस्वालला ‘नवीन गावसकर’, गिलला ‘पुजारा 2.0’, म्हणणारेही आपल्याला दिसत आहेत. हेच परिवर्तन संघाच्या यशाचं द्योतक आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं संघातील स्थान अमूल्य होतं, हे कोणीही नाकारू शकत नाही. पण त्यांनी संघाला जी शिस्त, आक्रमकता आणि विजयी वृत्ती दिली, ती नव्या पिढीनं आत्मसात केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेला पाया आता मजबूत झालेला आहे. आता त्या पायावर नव्या खेळाडूंनी आपलं स्वप्न उभं करायला सुरुवात केली आहे.
भारतीय संघाची कसोटी क्रिकेटमधील उंच भरारी ही केवळ रोहित किंवा विराट यांच्या नावावर मर्यादित राहिली नाही. ही उंच भरारी आता संपूर्ण संघाच्या सामूहिक प्रयत्नांनी चालू राहणार आहे. विराट-रोहित नसतानाही भारतीय कसोटी संघ जबरदस्त खेळतोय त्यामुळं विराट-रोहित गेल्यामुळं संघांची ताकद कमी झाली हा चाहत्यांचा भ्रम फोल ठरला आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.