

मुंबई: कृषी कायद्यांवरुन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. काल बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चे दरम्यान बोलताना शरद पवार आज अचानक उलट बोलत आहेत अशी टीका नरेंद्र मोदींनी यांनी केली होती. यावेळी खासदार सुप्रिया सुळे सभागृहात उपस्थित होत्या. पंतप्रधान मोदींनी केलेल्या या टीकेला सुप्रिया सुळेंनी जोरदार उत्तर दिले आहे.
“मोदींनी आमच्या पक्षाच्या प्रमुख व्यक्तीवर टीका केली. मी उभे राहून त्यांना थांबवू शकत होते, पण आमची ही संस्कृती नाही. मला काही कागदपत्रे, संपूर्ण तथ्यासह समोर मांडायचे आहे. भाजपा सदस्य असले तरी ते देशाचे पंतप्रधान आहे त्यांनी सभागृहात मांडलेला मुद्दा गांभीर्याने घेण्याची गरज आहे. शरद पवार कृषीमंत्री असताना त्यांनी राज्यांना लिहिलेल्या पत्राचा दाखला दिला. मात्र यावेळी त्यांनी राज्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे अमलबजावणी केली जावी हे वाचले नाही,” असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
“पंतप्रधान मोदींनी यु-टर्न हा शब्द वापरला त्यामुळे मला या सरकारने घेतलेल्या यु-टर्नबद्दल सांगायचे आहे. जेव्हा मनमोहन सिंग सरकारने जीएसटी आणला होता, तेव्हा गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला विरोध केला होता. बदल व्हायला पाहिजे यावर आमचा विश्वास आहे. आम्ही आरटीआय, अन्न सुरक्षा, शिक्षण हक्क, आधार, मनरेगा अशी अनेक विधेयके आणली. जेव्हा ही विधेयके आणण्यात आली तेव्हा सर्वांशी चर्चा करुन, प्रत्येकाचे मत मागवूनच कायदे करण्यात आले होते. करोना संकटात नोकरी गेलेल्यांना मनरेगामुळे रोजगार मिळाला. आधारलाही विरोध करण्यात आला होता, आणि आज ते जीएसटी, मनरेगा, आधारवरुन आपली पाठ थोपटत आहे. आता हा नेमका कोणता टर्न आहे मला माहिती नाही,” अशी टीका खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे.
“पंतप्रधानांनी इंटेंट आणि कंटेंट अशा शब्दांचा उल्लेख केला. त्यांनी केले तर इंटेट आणि कंटेंट आणि आम्ही केले तर यु-टर्न….हे थोडे चुकीचे आहे. आणि खासकरून इतक्या मोठ्या व्यक्तीकडून असे येणे,” असे म्हणत सुप्रिया सुळेंनी खंत व्यक्त केली आहे. “शरद पवारांनी त्यावेळी कायदा बदलण्याची शिफारस केली होती. तसाच मार्ग या सरकारने का निवडला नाही. जर असे पत्र सर्व मुख्यमंत्र्यांना लिहिले होते तर शरद पवार कृषीमंत्री असताना एकही आंदोलन का झाले नाही. मी कुणाची बाजू मांडत नाही, तेवढी क्षमता शरद पवारांमध्ये आहे. पण मला हे सगळे तथ्य मांडायचे कारण की पंतप्रधानांनी त्यांच्या नावाचा उल्लेख केला, असे सुप्रिया सुळेंनी सांगितले.
मोफत लसीकरणावरुन टीका
“निर्मला सीतारमन बिहारमध्ये गेल्या होत्या. तेव्हा त्यांनी मोफत लस देण्याची घोषणा केली होती. बिहारमध्ये देऊ तुम्ही मोफत लस देवू शकता तर महाराष्ट्रात का नाही? बिहारमध्ये जर तुम्ही मोफत लसीकरणाला सुरुवात केली असेल तर तशी माहिती आम्हालाही द्यावी. या माहितीचा आम्हालाही आनंद होईल. महाराष्ट्राचा 26 हजार 597 कोटींची जीएसटी भरपाई बाकी आहे. हे पैसै मिळाले तर आम्हीदेखील महाराष्ट्रात मोफत लसीकरण सुरू करु,” असे खासदार सुप्रिया सुळे यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांना सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.