

srinagar police station blast: जम्मू आणि काश्मीरमधील नौगाम पोलीस स्टेशनमध्ये शुक्रवारी (दि.१४) रात्री मोठी दुर्घटना घडली. 'व्हाईट-कॉलर' दहशतवादी मॉड्यूलच्या तपासात जप्त केलेल्या ३,००० किलोग्राम स्फोटकांचा साठा हाताळला जात असताना झालेल्या भीषण स्फोटात नऊ जण ठार झाले, तर ३२ हून अधिक जखमी झाले.
पोलिसांनी सांगितले की, ज्या स्फोटक साहित्याची तपासणी सुरू होती, ते साहित्य नुकतेच हरियाणातील फरीदाबाद येथून जप्त करून आणले होते. ही जप्त केलेली स्फोटके जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गझवत-उल-हिंदशी जोडलेल्या दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित होती. हे मॉड्यूल काश्मीर, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये कार्यरत होते.
तपासकर्त्यांनी अटक केलेला डॉक्टर मुजम्मिल गनाई याच्या भाड्याच्या घरातून ३६० किलो अमोनियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट, सल्फर आणि इतर रसायने जप्त केली होती. एकूण सुमारे ३,००० किलोग्राम स्फोटके आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले होते. मध्यरात्री झालेल्या या भीषण स्फोटाने पोलीस स्टेशनची इमारत उद्ध्वस्त झाली, खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि संपूर्ण परिसराची शांतता भंग झाली.
ऑक्टोबरच्या मध्यात नौगाममधील बुनपोरा येथील भिंतींवर सुरक्षा दलांना धमकावणारे आणि हल्ल्याचा इशारा देणारे पोस्टर दिसल्यानंतर श्रीनगर पोलिसांनी १९ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल केला. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर पोलिसांनी आरिफ निसार दार उर्फ साहिल, यासिर-उल-अशरफ आणि मकसूद अहमद दार उर्फ शाहिद या तिघांना अटक केली. या तिघांवर पूर्वी दगडफेक केल्याचे गुन्हे दाखल होते आणि तेच पोस्टर चिकटवताना दिसले होते.
या तिघांच्या चौकशीतून मौलवी इरफान अहमद (माजी पॅरामेडिक-नंतर इमाम) याला अटक झाली. इरफाननेच हे पोस्टर पुरवले होते आणि वैद्यकीय समुदायातील तरुण डॉक्टरांना कट्टरतावादी बनवले होते.
यानंतर तपास फरीदाबादमधील अल-फलाह विद्यापीठापर्यंत पोहोचला, जिथून डॉक्टर मुजम्मिल अहमद गनाई आणि शाहीन सईद यांना अटक करण्यात आली आणि मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मॉड्यूलमध्ये मुख्यत्वे डॉ. मुजम्मिल गनाई, डॉ. उमर नबी आणि डॉ. मुजफ्फर राथर हे तीन डॉक्टर होते. चौथा डॉक्टर, डॉ. आदिल राथर, याच्याकडून AK-५६ रायफल जप्त करण्यात आली आहे.
हा स्फोट दिल्लीत झालेल्या भीषण कार स्फोटानंतर चार दिवसांनी झाला आहे. दिल्लीतील स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला होता. सीसीटीव्ही फुटेजनुसार, दिल्ली स्फोटात वापरलेली कार मॉड्यूलचा सदस्य डॉ. उमर चालवत होता. सुरक्षा दलांच्या यशस्वी कारवाईमुळे घाबरून उमर पळून गेला होता आणि याच घाईगडबडीत झालेल्या चुकीमुळे लाल किल्ल्याजवळ स्फोट झाला असावा, असे तपास यंत्रणांना वाटते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.