

SIT Scam : पणजी, जमीन विक्री व्यवहारातील घोटाळ्यांचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेले विशेष तपास पथक (एसआयटी) हाच एक मोठा घोटाळा आहे.
या पथकाकडून सामान्यांना न्याय मिळण्याऐवजी त्यांच्या जमिनी कोणी चोरल्या आहेत, याची माहिती या पथकाच्या माध्यमातून घेतली जाते आणि त्या जमिनीबाबत तडजोड (सेटिंग) करण्याचे काम भाजप सरकार करीत असल्याचा आरोप रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचे प्रमुख मनोज परब यांनी केला.
पाटो येथील पक्षाच्या कार्यालयात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी कांदोळी व कळंगुट येथील ज्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करून त्या बळकावलेल्या आहेत.
त्या जमिनीचे मूळ मालक संतान डायस, अँटी डायस, इस्मी गोन्साल्वीस, नोएल डिसोझा यांची उपस्थिती होती.
परब म्हणाले, काँग्रेसच्या आणि भाजप सरकारच्या काळातही जमिनी हडप करण्याचे प्रकार घडलेले आहेत. सर्व्हे नं. ५३-१३, ८० ते ८३ व ८६ येथील जमिनी बळकावण्यात आलेल्या आहेत.
ज्यांनी बेकायदा घरे उभारली आहेत, त्यांना स्थानिक राजकारण्यांच्या सहकार्यामुळेच ना हरकत दाखले मिळाले आहेत. याप्रसंगी उपस्थित जमीन मालकांनी आम्ही तक्रार करूनही त्याची दखल पंचायत किंवा तत्सम कोणत्याही सरकारी यंत्रणेने घेतली नसल्याचे सांगितले.
सरकारचे दुर्लक्ष, स्थानिकांच्या पदरी निराशा
मनोज परब म्हणाले, गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ हे स्थानिक नागरिक आपल्या मालकीच्या जमिनींसाठी पोलिस, न्यायालय आणि सरकारने स्थापन केलेल्या ‘एसआयटी’कडे फेऱ्या मारत आहेत. मात्र, त्यांच्या पदरी निराशा आली आहे.
खोट्या कागदपत्रांच्या आधारे जमिनी विक्री पत्र तयार करण्यात आली आहेत. मयत व्यक्तींच्या नावे जमीन विक्रीची कागदपत्रे बनवण्यात आली आहेत. यातील बहुतांशी जमिनी कर्नाटकातील नागरिकांनी हडप केल्या असून यासाठी स्थानिक आमदार मायकल लोबो जबाबदार आहेत.
मुख्यमंत्र्यांना देणार प्रकरणाची फाईल
आम्ही कोणतीही माहिती पुराव्यानिशी सादर करीत आहोत. कळंगुट परिसरात जमीन हडप प्रकरणाचा आम्ही यापूर्वी आरोप केला होता.
सध्याच्या आमदारांवर राज्य सरकार कारवाई करणार आहे काय? या सर्व प्रकरणाची आम्ही फाईल मुख्यमंत्र्यांना देणार आहोत, ते आता त्यावर किती गतीने कारवाई करतात, ते पाहणार आहोत.
स्थानिकांच्या जमिनी बळकावून त्या जागेवर उभारलेली घरे पाडण्यात यावी अशी आमची मागणी आहे, असे रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचे प्रमुख मनोज परब यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी एसआयटीच्या कामावर आणि तिच्या निर्मितीवर टीका केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.