Rajmata Jijau: 'आम्ही स्वत: जातो, शिवबाला सोडवून आणतो'! राजमाता जिजाऊ कडाडल्या; राजगडावर नेमके काय घडले होते?

Rajmata Jijabai Death Anniversary: छत्रपती शिवाजी महाराजांना, त्यांच्या सहकारी मावळ्यांना स्वराज्यस्थापनेसाठी प्रेरणा देणारी महत्वाची व्यक्ती म्हणजे राजमाता जिजाऊ.
Rajmata Jijabai Death Anniversary | Jijau History
Rajmata Jijau Marathi InformationDainik Gomantak
Published on
Updated on

छत्रपती शिवाजी महाराजांना, त्यांच्या सहकारी मावळ्यांना स्वराज्यस्थापनेसाठी प्रेरणा देणारी महत्वाची व्यक्ती म्हणजे राजमाता जिजाऊ. राजमाता जिजाऊ करारी होत्या, उत्तम प्रशासक होत्या. थोरले महाराज शहाजीराजे कर्नाटकात व्यस्त असतानाही त्यांनी पुणे परगण्यात उत्तम कारभार चालवला होता.

शिवरायांसोबतच्या मावळ्यांची त्या तितक्याच तन्मयतेने काळजी घ्यायच्या. पण तेंव्हा एक घटना अशी घडली आणि आई जिजाऊ तलवार घेऊन लढाईसाठी जाणार होत्या. काय झाले होते नेमके याची आपण माहिती घेऊ.

आदिलशाही चिंताग्रस्त होती. सल्तनतीचा भारदस्त सरदार अफजलखान मारला गेला होता. त्याच्यासोबत गेलेल्या सैन्याची धूळदाण उडाली होती. हत्ती, घोडे, द्रव्य बरंच काही जावळीत सोडून आदिलशाहीच्या भल्याभल्या सरदारांना पळ काढावा लागला होता.

अफजलखान मारला गेल्यावर पेटून उठलेला त्याचा मुलगा फाजलखान आणि रुस्तुमेजमान मराठ्यांवर चालून गेले पण त्यांनाही दारुण पराभव स्वीकारावा लागला. शहाजी भोसलेंच्या मुलाने आणि त्यांच्या सवंगड्यांनी नाकी दम करून ठेवला होता.

अचानक आदिलशहाला त्याच्या एका जुन्या सरदाराची आठवण आली. तो सरदार म्हणजे राकट हबशी फौज बाळगणारा सिद्दी जौहर. आदिलशहाने सलाबतखान असा किताब देऊन त्याला गौरवले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला नेस्तनाबूत करण्याची कामगिरी दिली.

यावेळी शिवाजी महाराज मिरज उर्फ मूर्तिजाबादेच्या किल्ल्याला वेढा देऊन बसले होते. सिद्दी जौहरला भलीमोठी फौज देण्यात आली. अफजलखान जावळीला गेला होता त्यापेक्षा भली थोरली फौज होती ही.

सिद्दी जौहर स्वराज्यात घुसू नये, रयतेचे नुकसान होऊ नये म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या हद्दीच्या टोकावर असणारया पन्हाळगडावर जाण्याचा निर्णय घेतला. सिद्दी जौहरने कोल्हापूरजवळील पन्हाळ्याला वेढा दिला. तोफा, बंदुकांचा मारा सुरू केला. सोबत राजापुरातून ब्रिटिश हेन्री रिव्हिंगटनची मदत घेऊन मोठ्या तोफा आणल्या गेल्या. महाराज वेढ्यात अडकले.

दरम्यान राजांना कोंडीत पकडण्यासाठी शाहिस्तेखान लाखोंची फौज घेऊन स्वराज्याच्या दिशेने निघाला होता. महाराजांना आशा होती की सिद्दी जौहरचा वेढा पावसात ढिला पडेल, बाहेरून सरनौबत नेतोजी पालकर त्याच्यावर आक्रमण करतील, गडावरील शिबंदी चढाई करेल आणि हा वेढा मोडून काढता येईल. पण सिद्दीने वेढा कडक ठेवला होता. त्यात अजिबात बेशिस्तपणा नव्हता.

राजगडावर राजमाता जिजाऊ चिंताग्रस्त होत्या. महाराजांच्या छोट्या वयात आणि मूठभर फौजेवर हे सलग दुसरे संकट कोसळले होते. तिकडून तिसरे संकट अर्थात शाहिस्तेखान चालून येत होते.

आईसाहेबांचे लक्ष पालकरांच्या हालचालीवर होते. दरम्यान नेतोजीनी आधी थेट विजापूरवरच हल्ला चढवला पण त्यात त्यांना यश आले नाही. इकडे जौहर आपला फास आवळतच चालला होता. सगळे स्वराज्य चिंतेत होते. काहीच मार्ग दिसत नव्हता.

एकेदिवशी आई जिजाऊ सदरेवरती आल्या. त्यांच्या डोक्यात बरेच विचार सुरू होते. चेहऱ्यावरती त्वेष दिसत होता. सर्वांसमोर त्या उद्वेगाने म्हणाल्या आम्ही स्वत: पन्हाळ्याच्या मोहिमेवर जातो आणि शिवरायांना सोडवून आणतो.

Rajmata Jijabai Death Anniversary | Jijau History
Baji Pasalkar: स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या 16 वर्षीय शिवरायांसाठी 65 वर्षाच्या वीर 'बाजी पासलकर' यांनी दिली होती पहिली आहुती

राजगडावरील मंडळीना प्रश्न पडला की आता करावे काय? सगळ्यांच्या कपाळावर आठया पडल्या. आई जिजाऊंच्या म्हणण्यामागे पुत्रप्रेम होते, स्वराज्य प्रेम होते, रयतेवरचे प्रेम होते. त्यावेळी राजगडावरून त्या कारभार सांभाळत होत्या.

त्यांच्या सुचनेखाली राजगडावरची शिबंदी स्वराज्यात बारीक लक्ष ठेऊन होती. आता पुढे काय? राजमाता स्वत:च आता हाती तलवार घेऊन जातील की काय अशी परिस्थिती होती. कुणालाही त्यांच्या नजरेला नजर मिळवून उत्तर देता येईना. इतक्यात बातमी आली.. सरनौबत गडावर पोचले. हुश्श! गडावरील मंडळींच्या जीवात जीव आला.

Rajmata Jijabai Death Anniversary | Jijau History
Shivaji Maharaj: मल्लम्मा देवीच्या पराक्रमाने छत्रपती शिवाजी महाराज थक्क झाले, सन्मानाने संस्थान परत केले; 'युद्धनायक' शिल्पाची कथा

नेतोजी राजगडावर पोचले. ते आई जिजाऊंच्या समोर सदरेवरती हजार झाले. आईसाहेबांनी त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली आणि कडाडल्या की आम्हीच जातिनिशी जातो आणि शिवबाची सुटका करून येतो. आईसाहेबांचे हे रूप सदर पहिल्यांदा बघत होती. नेतोजीनी आईसाहेबांसमोर हात जोडले, त्यांची समजूत घातली आणि पन्हाळ्याकडे कूच केली.

नेतोजीची चढाई काही कारणाने यशस्वी होऊ शकली नाही. सिद्दीचा वेढा अभेद्य राहिला. पुढे महाराजांनी चातुर्याने सिद्दीला चकवून विशाळगडावर कूच केली आणि महाराज वेढयातून सुखरूप सुटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com