
कोटा (राजस्थान): राजस्थानमधील बारन जिल्ह्यातील डोंगराळ भागात असलेल्या एका वस्तीत स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ७८ वर्षांनंतर वीजजोडणी झाली आहे. गावकऱ्यांच्या अनेक वर्षांच्या मागणीनंतर या गावात आता वीजेचा प्रकाश पडत आहे. या वस्तीतील प्रत्येक घरात वीजपुरवठा सुरू झाला आहे.
बारन जिल्ह्यातील सांवरा गावात सहारिया समुदायाची ४० घरे आहेत. या वस्तीची लोकसंख्या सुमारे दोनशे आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून दरम्यानच्या काळात देशाने अनेक आघाड्यांवर प्रगती केली असली तरी दुर्गम भागांत असलेल्या काही गावांमध्ये अद्याप वीजही पोहोचलेली नाही.
डोंगराळ भागात असलेले सांवरा हे त्यापैकीच एक गाव होते. या गावातील लोकांनी अनेकवेळा सरकारकडे यासाठी पाठपुरावा केला होता. अखेर मागील महिन्यात गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना गावात बोलवत त्यांच्याकडे तक्रार केली.
या तक्रारीची तातडीने दखल घेत जिल्ह्याधिकाऱ्यांनी आवश्यक ते आदेश दिले. वीजमंडळाने वीस ते पंचवीस दिवस सलग काम करत सांवरा गाव उजळवून टाकले. अनेक दशकांच्या अंधारानंतर आता कुठे प्रकाश दिसला आहे, अशी प्रतिक्रिया या गावातील लोकांनी व्यक्त केली.
सहारिया समुदाय हा विशेष संरक्षित आदिवासी समूह आहे. पंतप्रधान-जनमन योजनेअंतर्गत या आदिवासी समुदायाला सरकारकडून पक्की घरेही मिळणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.