

नवी दिल्ली: “देशातील तरुणांवर पॅलेट गन आणि एके-४७ वापरण्याची काय गरज होती? हे विद्यार्थी दहशतवादी होते का? पॅलेट गन चालवण्याचा आदेश नेमका कोणी दिला?” असा संतप्त सवाल करत काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी मंगळवारी लोकसभेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. देशातील तरुणांच्या आंदोलनावर झालेल्या कारवाईवरून त्यांनी मोदी सरकारला धारेवर धरत अनेक सवाल उपस्थित केले.
प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर उपरोधिक टीका करताना म्हटले की, “पंतप्रधानांनी कॅमेऱ्यासाठी मोबाईलचा कोन बदलण्यापेक्षा आपल्या हृदयाची दिशा बदलायला हवी.” देशातील तरुणांचा व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी ठोस पावलांची गरज आहे; परंतु दुर्दैवाने या मोदी सरकारला त्याची कोणतीही जाणीव उरलेली नाही, असा आरोप त्यांनी केला.
सरकारच्या कारभारावर कडाडून टीका करताना त्या म्हणाल्या, “या सरकारच्या कार्यकाळात मतांची चोरी झाली, दानचोरी झाली आणि उद्योगपती मित्रांसाठी राष्ट्रीय संपत्तीचीही चोरी झाली. इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांच्या जमिनी चोरल्या गेल्या, पण आता तर हद्द झाली असून देशातील संपूर्ण युवकांची स्वप्नेच चोरण्यात आली आहेत.”
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे समर्थन करत प्रियांका गांधी म्हणाल्या की, देशातील युवक न्यायाची मागणी करत होते, ते कोणतीही भीक मागत नव्हते. तसेच ते सरकार उलथवून टाकण्यासाठी रस्त्यावर आले नव्हते. तर स्वतःच्या हक्कासाठी आणि भविष्यासाठी लढत होते. शासनाच्या दडपशाहीचा निषेध करताना त्या शेवटी म्हणाल्या, “मुला-मुलींच्या अंगावर बसलेल्या प्रत्येक लाठीमुळे विद्यार्थ्यांची पाठ नाही, तर या सरकारचा अहंकार जास्त दुखावला गेला आहे.” प्रियांका गांधी यांच्या या वक्तव्यामुळे लोकसभेत जोरदार गदारोळ पाहायला मिळाला असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.