

मथुरेतील आणि वृंदावनमधील अत्यंत लोकप्रिय संत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रेमानंद महाराज यांच्या संदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेमानंद महाराज पूर्वी वृंदावन येथील 'श्री कृष्ण शरणम' या गृहनिर्माण सोसायटीमध्ये वास्तव्यास होते. शनिवारी रात्री या सोसायटीतील फ्लॅट नंबर २१२ मध्ये अचानक भीषण आग लागली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच महाराजांच्या लाखो अनुयायांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. मात्र, सुदैवाची बाब ही आहे की, महाराज आता या फ्लॅटमध्ये राहत नसून ते दुसऱ्या आश्रमात वास्तव्यास आहेत.
शॉर्ट सर्किटमुळे लागली भीषण आग मिळालेल्या माहितीनुसार, श्री कृष्ण शरणम सोसायटीतील या फ्लॅटमध्ये विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. आगीचे स्वरूप इतके रौद्र होते की, काही वेळातच फ्लॅटमधून धुराचे लोट बाहेर येऊ लागले. आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाला फ्लॅटच्या खिडक्यांच्या काचा फोडून आत प्रवेश करावा लागला. सुदैवाने, अग्निशमन दलाने तत्परता दाखवल्यामुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळवता आले आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीत फ्लॅटमधील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
महाराजांचे वास्तव्य आता केलीकुंज आश्रमात प्रेमानंद महाराजांच्या भक्तांसाठी दिलासादायक बाब ही आहे की, महाराज गेल्या काही काळापासून या फ्लॅटमध्ये राहत नाहीत. ते सध्या वृंदावनमधील 'केलीकुंज' येथील त्यांच्या मुख्य आश्रमात वास्तव्यास आहेत आणि ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. ज्यावेळी ही आगीची घटना घडली, तेव्हा त्या फ्लॅटमध्ये काही साधू-संत मुक्कामाला होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर सीओ सदर पी.पी. सिंह यांनी प्रसारमाध्यमांना अधिकृत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, "शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती आणि परिस्थिती आता नियंत्रणात आहे. हा फ्लॅट नेमका कोणाच्या नावावर आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. प्राथमिक तपासात तिथे काही साधू वास्तव्यास असल्याचे समजले आहे."
प्रेमानंद महाराज हे राधा राणीचे निस्सीम उपासक असून, ते आपल्या प्रवचनातून तरुणांना नामजप आणि सात्विक जीवनाचा मार्ग दाखवतात. त्यांची लोकप्रियता पाहता, या घटनेची चर्चा संपूर्ण देशात होत आहे. प्रशासन आता या आगीच्या मूळ कारणांचा आणि सुरक्षेच्या नियमांचा अधिक खोलवर तपास करत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.