Chandigarh corporators on Goa Garbage Plant: चंदीगड महापालिकेच्या नगरसेवकांनी नुकताच गोव्याचा दौरा केला. गोव्यातील कचरा प्रकल्पाला भेट देऊन तेथील कार्यपद्धती समजून घेणे, हा या दौऱ्यामागचा उद्देश होता. चंदीगड महापालिका त्यांच्या कार्यक्षेत्रात डड्डू माजरा येथे कचरा प्रकल्प उभारत आहे.
त्याबाबत स्पष्टता यावी, यासाठी हा दौरा झाला होता. तथापि, या दौऱ्यानंतर महापालिकेत महापौर आणि नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
चंदीगड महापालिकेत भाजपची सत्ता असून भाजपचे अनुप गुप्ता महापौर आहेत. अनुप गुप्ता हे चंदीगडमधील डड्डू माजरा येथील कचरा प्रकल्पाच्या समर्थनासाठी गोव्यातील प्रकल्पाबाबत खोटे बोलत असल्याचा आरोप केला जात आहे.
चंदीगड महापालिकेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात महापौरांनी म्हटले आहे की, उत्तर गोव्यातील कचरा प्रकल्प निवासी क्षेत्रापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर आहे. प्रकल्पाशेजारी सुमारे 50,000 लोक राहतात.
महापौरांनी म्हटले आहे की, दोन्ही प्लांट निवासी भागापासून जवळ आहेत. उत्तर गोव्यातील प्रकल्पाच्या भिंतीपासून 100 मीटर अंतरावर निवासी क्षेत्र सुरू होते, तर दक्षिण गोव्यातील प्रकल्पाच्या भिंतीपासून निवासी क्षेत्र अवघ्या 20 मीटर अंतरावर आहे.
तर या प्रकल्पाला भेट दिलेले काँग्रेसचे नगरसेवक गुरप्रीत सिंग गाबी यांनी मात्र हा प्रकल्प निवासी भागापासून दीड किलोमीटर अंतरावर आहे, असे म्हटले आहे. महापौरांनी ज्या निवासी क्षेत्राचे वर्णन केले आहे ते कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी बांधले आहे.
प्रकल्पाच्या एरियल व्ह्युमध्येही ते दिसते, हे महापौरांचे म्हणणे चुकीचे असल्याचे गाबी यांनी म्हटले आहे. या कचरा प्रकल्पाची क्षमता 100 टीडीपी असली तरी सध्या केवळ 15 टीडीपी कचऱ्यावर दररोज प्रक्रिया केली जात आहे. यापैकी 8 टीडीपी ओला कचरा आणि 6 टीडीपी सुका कचरा आहे, हा प्लांट 12 एकरांत पसरलेला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
या दौऱ्यावेळी भाजप नगरसेवकांनी प्रमोद सावंत यांचीही भेट घेतली. मात्र, काँग्रेस नगरसेवकांनी सावंत यांची भेट घेतलेली नाही. या दौऱ्यात नगरसेवकांसमवेत ड्डडू माजरा येथील नऊ जणांचाही समावेश होता.
चंदीगडमधील या नगरसेवकांच्या गोवा दौऱ्याला सुरवात होण्याच्या आधीपासूनच या दौऱ्याची चर्चा सुरू झाली होती. आता दौरा संपल्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या राजकारणातून त्याचे कवित्व सुरू आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.