कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात रविवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि जेडीएसवर जोरदार हल्लाबोल केला.
आज मी भ्रष्टाचाराविरुद्ध लढत असताना काँग्रेसला सर्वाधिक त्रास होत आहे, त्यामुळेच काँग्रेसचा माझ्याबद्दलचा द्वेष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. माझ्यावर जोरदार टीका देखील केली जात आहे. असे मोदी म्हणाले. यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या 'विषारी साप' या वक्तव्यालाही प्रत्युत्तर दिले.
'काँग्रेसचे लोक ‘मोदी तेरी कबर खुदेगी’ अशी धमकी देत आहेत. आता ते माझी तुलना सापाशी करत जनतेकडून मते मागत आहेत. साप हा भगवान शंकराच्या गळ्याचे सौंदर्य वाढवतो आणि माझ्यासाठी देशातील जनता हे देवाचे रूप आहे, शिवाचेच रूप आहेत.' अशा शब्दात मोदींनी खर्गेंच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले.
काँग्रेस आणि जेडीएसवर हल्लाबोल करताना पंतप्रधान म्हणाले की, 'आज तुमचे एवढ्या मोठ्या संख्येने लोक येथे आल्याने काँग्रेस आणि जेडीएस दोघांचीही झोप उडणार आहे. कर्नाटकच्या विकासात हे दोन्ही पक्ष सर्वात मोठा अडथळा आहेत. काँग्रेस आणि जेडीएस एकत्र खेळू शकतात, पण कर्नाटकची जनता त्यांना क्लीन बॉल टाकणार आहे.'
'कर्नाटकची ही निवडणूक केवळ आगामी पाच वर्षांसाठी आमदार, मंत्री किंवा मुख्यमंत्री बनवण्यासाठी नाही, तर ही निवडणूक येत्या 25 वर्षांच्या विकसित भारताच्या रोडमॅपचा पाया मजबूत करण्यासाठी आहे. एवढ्या मोठ्या व्हिजनवर अस्थिर सरकार कधीच काम करू शकत नाही.'
काँग्रेसच्या कार्यकाळाचा संदर्भ देत मोदी म्हणाले, 2014 पूर्वी काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचाराच्या काळात जगाने भारताकडून सर्व आशा सोडल्या होत्या. तुमच्या एका मताने संपूर्ण परिस्थिती बदलली. आज भारताची प्रतिष्ठा उंचावर आहे, अर्थव्यवस्थेचा वेग वेगवान आहे आणि जग भारताला एक उज्ज्वल स्थान म्हणून संबोधत आहे.
कर्नाटकला भारतातील क्रमांक एकचे राज्य बनवण्याचा भाजपचा संकल्प आहे, त्यामुळे येथे डबल इंजिनचे सरकार आवश्यक असल्याचे मोदी म्हणाले. जोपर्यंत येथे काँग्रेस-जेडीएस युती राहिली, तोपर्यंत कर्नाटकच्या विकासाला ब्रेक लागला. जेव्हा येथे डबल इंजिनचे सरकार आले, तेव्हा येथील विकासाने नवी गती घेतली.
आधुनिक कनेक्टिव्हिटीसाठी डबल इंजिन सरकार करत असलेल्या कामामुळे या संपूर्ण प्रदेशात नवीन शक्यता निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. बेंगळुरू-चेन्नई एक्स्प्रेस वे येथील शेतकरी आणि उद्योग या दोघांसाठी नवीन संधी निर्माण करेल, त्यावर काम वेगाने सुरू आहे. असे मोदी म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.