गुवाहाटी-बिकानेर एक्स्प्रेस (Guwahati Bikaner Express) चा गुरुवारी संध्याकाळी पश्चिम बंगालमधील मैनागुरी येथे अपघात झाला . पाटणा ते गुवाहाटी बिकानेर एक्स्प्रेस मैनागुरी आणि डोमोहनी रेल्वे स्थानकादरम्यान रुळावरून घसरल्याने हा मोठा अपघात झाला. मदत आणि बचावासाठी एनडीआरएफची (NDRF) टीम घटनास्थळी पोहचली होती.
एनडीआरएफचे डीजी अतुल करवाल यांनी सांगितले की, बिकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले आहेत. या अपघातात जीवित व वित्तहानी झाल्याचे सांगताना ते म्हणाले की, या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत, ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एनडीआरएफचे दोन पथक मदत आणि बचावासाठी घटनास्थळी गेले होते.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळाजवळ असलेल्या बीएसएफ कॅम्पचे 200 हून अधिक जवान मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचले होते. प्रवाशांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी रेल्वेने हेल्पलाइन क्रमांकही जारी केले आहेत. बीकानेर 0151-2208222, जयपुर 0141-2725942, 9001199959, 03612731622, 03612731623.
ट्रेनचे डबे खराब झाले आहेत
गुवाहाटी-बिकानेर एक्स्प्रेसचा क्रमांक 15633 आहे. ही ट्रेन बिकानेरहून गुवाहाटीला जात होती. अपघाताच्या वेळी एक्सप्रेस ट्रेन 40 किमी प्रतितासाच्या वेगाने धावत होती. ट्रेनच्या 12 डब्यांचे नुकसान झाले आहे. यातील चार डब्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने सांगितले की, ट्रेनमध्ये अचानक जोराचा धक्का बसला आणि डबे उलटले.
ममता बॅनर्जी यांनी मदतकार्यात सहभागी होण्याच्या सूचना दिल्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची आभासी बैठक सुरू होती. त्याचवेळी अपघाताची माहिती मिळाली. सीएम ममता बॅनर्जी यांनी उत्तर बंगालच्या प्रशासकीय अधिकार्यांशी चर्चा केली असून त्यांना अपघातस्थळी जाण्याचे निर्देश दिले. यासोबतच मदतकार्यात सहभागी होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अपघाताची चौकशी केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. बैठकीदरम्यानच पीएम मोदींनी मुख्यमंत्री बॅनर्जी यांना अपघाताबाबत विचारणा केली.
रेल्वेमंत्री घटनास्थळी
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जलपाईगुडीला जाणार असून ते या अपघातामध्ये जखमी झालेल्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.