MC Mary Kom, Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी भारतीय संघाला धक्का... मेरी कोमने सोडले 'हे' मोठे पद

MC Mary Kom: 21 मार्च रोजी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने (IOA) तिची शेफ डी मिशन म्हणून नियुक्ती केली होती.
Mary Kom
Mary Kom Dainik Gomantak
Published on
Updated on

MC Mary Kom, Paris Olympics 2024: भारताची दिग्गज बॉक्सर आणि सहा वेळची विश्वविजेती मेरी कोम हिने पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी या बहुराष्ट्रीय स्पर्धेतील देशाच्या संघाच्या प्रमुख (शेफ डी मिशन) पदाचा राजीनामा दिला आहे. 21 मार्च रोजी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने (IOA) तिची 'शेफ डी मिशन' म्हणून नियुक्ती केली होती. मेरी कोमने पदावरुन पायउतार होण्यामागे वैयक्तिक कारण सांगून तिच्याकडे दुसरा पर्याय नसल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, मेरी कोमने भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) अध्यक्ष पीटी उषा यांना पत्र लिहून तिला या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली. मेरीने पीटी उषा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, ''कोणत्याही रुपात देशाची सेवा करणे ही अभिमानाची बाब आहे. यासाठी मी मानसिक तयारी केली होती. पण ही जबाबदारी मी पेलू शकणार नाही, याची मला खंत आहे. मी वैयक्तिक कारणांमुळे माघार घेत आहे.''

मेरी कोमची गेल्या महिन्यात नियुक्ती झाली होती

41 वर्षीय मेरीने सांगितले की, ''अशाप्रकारे थांबायला मला खंत वाटते. पण माझ्याकडे पर्याय नाही. ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मी सदैव उपस्थित राहीन.'' IOA ने 21 मार्च रोजी तिची नियुक्ती जाहीर केली होती. लंडन ऑलिम्पिक 2012 कांस्यपदक विजेती मेरी कोम 26 जुलै ते 11 ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या ऑलिम्पिक खेळांमध्ये भारतीय दलाची मोहीम प्रमुख असती.

पीटी उषा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, 'ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर आणि IOA ऍथलीट आयोगाच्या प्रमुख मेरी कोम यांनी वैयक्तिक कारणांमुळे पदावरुन पायउतार झाल्यामुळे आम्हाला दुःख झाले आहे. आम्ही त्यांचा निर्णय आणि गोपनीयतेचा आदर करतो. त्यांच्या रिप्लेसमेंटची लवकरच घोषणा केली जाईल.''

पीटी उषा म्हणाल्या की, ''मी त्यांची विनंती समजू शकते. मी त्यांच्या निर्णयाचा आदर करते. मी त्यांना एकच सांगू इच्छिते की, IOA आणि माझा पाठिंबा नेहमीच तुम्हाला असेल. मी त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्याची तुम्हा सर्वांनाही विनंती करते.''

मेरी कोमने अनेक विक्रम केले

बॉक्सिंग इतिहासातील मेरी कोम ही सहा वेळा विश्वविजेती ठरणारी पहिली महिला बॉक्सर आहे. लंडन 2012 ऑलिम्पिकमध्ये तिने कांस्यपदक जिंकले होते. ती पाच वेळा आशियाई चॅम्पियन राहिली आहे. 2014 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला बॉक्सर होती. 2018 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला बॉक्सर आहे.

दरम्यान, 2012 ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर मेरी कोमने तिच्या तिसऱ्या मुलाला जन्म दिला होती, त्यानंतर ती पुन्हा एकदा ब्रेकवर गेली होती. यानंतर तिने शानदार पुनरागमन केले. दिल्ली येथे झालेल्या 2018 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिने युक्रेनच्या हॅना ओखोटावर 5-0 असा विजय नोंदवला होता. एका वर्षानंतर, तिने तिचे आठवे विश्वचषक पदक जिंकले.

मेरी कॉम एका कार्यक्रमात म्हणाली होती की, ''मी माझ्या आयुष्यात सर्वकाही मिळवले आहे. मला अजूनही स्पर्धांमध्ये भाग घेण्याची भूक आहे, पण आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग फेडरेशनचे नियम मला तसे करण्यास परवानगी देत ​​नाहीत. पुरुष आणि महिला बॉक्सरना फक्त वयाच्या 40 वर्षापर्यंत बॉक्सिंग करण्याची परवानगी आहे, त्यामुळे मी आता कोणत्याही मोठ्या स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com