Medical Education : देशात वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 2023 मध्ये सरकारने वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागा आता 1,07,658 केल्या आहेत.
National Medical Commission 50 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिल्यानंतर आता देशातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 702 झाली आहे. सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यावर्षी ८,१९५ नवीन जागांची भर पडली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सांगितले की, नवीन ५० पैकी ३० सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आहेत. त्यांनी सांगितले की तेलंगणात 13, आंध्र प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी पाच, महाराष्ट्रात चार, आसाम, गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी तीन, हरियाणा, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेशमध्ये प्रत्येकी दोन, नागालँड आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी एका वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळाली आहे.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (NMC) पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण मंडळाच्या तपासणीदरम्यान, निर्धारित मानकांचे पालन न केल्याच्या आरोपाखाली गेल्या अडीच महिन्यांत देशभरातील 38 वैद्यकीय महाविद्यालयांची संलग्नता काढून घेण्यात आली. याशिवाय 102 वैद्यकीय महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 38 वैद्यकीय महाविद्यालयांपैकी 24 महाविद्यालयांनी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे तर सहा महाविद्यालयांनी आरोग्यमंत्र्यांकडे दाद मागितली आहे.
मान्यता गमावलेल्या महाविद्यालयांना त्रुटी आणि कमतरता दूर करून एकदा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे आणि नंतर आरोग्य मंत्रालयाकडे अपील करण्याची परवानगी आहे. सूत्रांनी सांगितले की, महाविद्यालये विहित नियमांचे पालन करत नाहीत आणि आयोगाच्या यूजी बोर्डाने केलेल्या तपासणीत सीसीटीव्ही कॅमेरे, आधार लिंक बायोमेट्रिक हजेरी प्रक्रिया आणि फॅकल्टी रोलशी संबंधित अनेक त्रुटी लक्षात आल्या.
सरकारी आकडेवारीनुसार, 2014 पासून देशातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी फेब्रुवारीमध्ये राज्यसभेत सांगितले की वैद्यकीय महाविद्यालयांच्या संख्येत 69 टक्के वाढ झाली आहे, 2014 पूर्वी 387 वरून आता 654 (सध्या 702 वैद्यकीय महाविद्यालये आहेत).
याशिवाय, एमबीबीएसच्या जागांची संख्या 94 टक्क्यांनी वाढली, 2014 पूर्वीच्या 51,348 वरून 99,763 वर, आणि पदव्युत्तर जागांची संख्या 107 टक्क्यांनी वाढली, 2014 पूर्वीच्या 31,185 वरून 64,559 पर्यंत. देशात डॉक्टरांची संख्या वाढवण्यासाठी सरकारने मेडिकल कॉलेज आणि त्यानंतर एमबीबीएसच्या जागा वाढवल्याचं पवार म्हणाले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.