

Bangladesh Team Internal Conflict: बांगलादेश महिला क्रिकेट संघाची कर्णधार निगार सुलताना हिने आपल्या संघातील कनिष्ठ खेळाडूंना मारहाण केल्याच्या आणि वाईट वागणूक दिल्याबद्दलच्या आरोपांवर अखेर मौन सोडले. विशेष म्हणजे, तिने या वादामध्ये भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिचे नाव घेत भारतीय कर्णधाराच्या आक्रमक कृतींवरही निशाणा साधला.
निगार सुलताना हिच्यावर अलीकडेच संघातील वेगवान गोलंदाज जहाँआरा आलम हिने गंभीर आरोप केले. सुलताना कनिष्ठ खेळाडूंना मारहाण करते, असा जहाँआरा आलमने दावा केला. या आरोपांना उत्तर देताना सुलतानाने थेट हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) 20 ऑगस्ट 2023 च्या घटनेचा उल्लेख केला. बांगलादेशच्या भारत दौऱ्यादरम्यान एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना रंगला होता. या सामन्यात हरमनप्रीत कौरला खराब अम्पायरिंगमुळे LBW बाद दिले गेले. यामुळे संतापलेल्या हरमनप्रीतने रागाच्या भरात आपल्या बॅटने स्टंप्स तोडले होते. सामना संपल्यावर बक्षीस वितरण समारंभात तिने अम्पायरिंगवर टीका केली होती आणि संयुक्त फोटोसेशनदरम्यान बांगलादेशच्या खेळाडूंवरही आक्षेपार्ह टिप्पणी केली होती.
'डेली क्रिकेट'ला दिलेल्या मुलाखतीत निगार सुलतानाने जहाँआरा आलमच्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना हरमनप्रीत कौरचा उल्लेख केला. सुलताना म्हणाली, "मी कोणाला मारहाण का करु? माझा अर्थ, मी माझ्या बॅटने स्टंप्सवर का मारेन? मी काय हरमनप्रीत आहे, जी अशा प्रकारे स्टंप्सवर मारेल? मी असे का करीन?"
ती पुढे म्हणाली, "माझ्या खासगी आयुष्यात मी स्वयंपाक करत असताना किंवा दुसरे काही करत असताना मी माझी बॅट इकडे-तिकडे मारु शकते, मी माझ्या हेल्मेटवर मारु शकते, तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे. पण दुसऱ्या कोणासोबत मी असे का करेन? फक्त कोणीतरी असे म्हणतेय म्हणून? तुम्ही इतर खेळाडूंना किंवा कोणालाही विचारु शकता की, मी कधी असे काही केले आहे का?"
जहाँआरा आलम, जी सध्या ऑस्ट्रेलियामध्ये राहत आहे, तिने काही दिवसांपूर्वी खुलासा केला होता की, बांगलादेशच्या कनिष्ठ महिला क्रिकेटपटूंनी तिला फोन करुन सुलतानाने त्यांना मारहाण केल्याचा दावा केला होता. यावर सुलतानाने प्रत्युत्तर दिले. ती म्हणाली, "जर माझ्यावर मारहाणीचा आरोप असेल, तर कनिष्ठ खेळाडूंनी परदेशात राहणाऱ्या एका व्यक्तीला फोन करण्याऐवजी थेट उच्च अधिकाऱ्यांना याची माहिती दिली असती."
निगार सुलतानाने अलीकडेच महिला विश्वचषक 2025 मध्ये बांगलादेश संघाचे नेतृत्व केले. या स्पर्धेत बांगलादेश संघाने कोलंबो येथे पाकिस्तानविरुद्ध एकच विजय नोंदवला, तर भारताने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन विजेतेपद पटकावले. या स्पर्धेतील खराब कामगिरीनंतर कर्णधाराच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले. सध्या बांगलादेश (Bangladesh) क्रिकेटमध्ये कर्णधार आणि खेळाडूंमधील अंतर्गत वादांमुळे मोठी चर्चा सुरु आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.