गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाख पुन्हा वाढल्याने नागरिक उकाड्यामुळे हैराण झालेले आहेत. अशा नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण येत्या दोन ते तीन दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. ( Monsoon will arrive in Kerala in next two to three days )
काल दिनांक 26 मे रोजी मान्सून श्रीलंकेत दाखल झाला आहे. तर केरळमध्ये आज मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. केरळमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. केरळमध्ये 50 टक्क्यांहून अधिक स्टेशन्सवर पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार 1 जूनच्या आधी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
जूनच्या सुरुवातीला मान्सूनची वाटचाल संत गतीने असणार आहे. परंतु, जून-जुलै महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. वेळेच्या सहा दिवस आधीच मान्सून अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे. दरम्यान, आज संध्याकाळपर्यंत केरळमध्ये मान्सून कधी दाखल होईल याची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.
विदर्भात उष्णतेच्या लाटांपासून नागरिकांची होणार सुटका
विदर्भात देखील उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला आहे. परंतु, विदर्भात देखील अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान, गेले काही दिवस अरबी समुद्रात रेंगाळलेला मान्सून पुढे सरकला आहे. मान्सूनच्या पुढच्या वाटचालीसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाल्यामुळे अरबी समुद्राचा आग्नेय आणि नैऋत्य भाग मान्सूननं जवळपास व्यापला आहे. मालदीव आणि कोरोरिन क्षेत्रात मान्सून सक्रीय झाला आहे. तसेच दक्षिण आणि इशान्य बंगालच्या उपसागराच्या काही भागातही मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. मान्सूनचा हा प्रवास असाच सुरु राहिला तर पुढील आठवडाभरात मान्सून राज्याच्या वेशीवर पोहोचेल अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जात आहे.
उन्हाच्या तडाख्यातून नागरिकांची होणार सुटका
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात उन्हाच्या तडाख्याने नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. काही ठिकाणी प्रखर उन्हाचा तडाखा नसला तरी हवेतील उष्मा कमी होण्याचं नावं घेत न्हवता यामुळे दुपारच्या दरम्यान नागरिकांअभावी रस्ते ओस पडत होते. मात्र हवामान विभागानं दिलेल्या माहितीने नागरिकांची उन्हाच्या तडाख्यातून सुटका होणार आहे. कारण महाराष्ट्रात लवकरच मान्सून दाखल होणार आहे.
नैऋत्य मोसमी पावसाचं अर्थात मान्सूनचं अंदमानमध्ये अर्थात बंगालच्या उपसागरात 16 मे रोजीच आगमन झालं आहे. याशिवाय केरळमध्ये येत्या काही दिवसांत पावसाचं झोकात आगमन होणार असल्याचं देखील हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्यातील खरीप हंगामापूर्वी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये भारतीय हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.