
वाराणसी : ‘‘जागतिक अर्थव्यवस्था अनिश्चिततेच्या गर्तेमध्ये असून या काळात कोणत्याही देशाने स्वतःचे हितसंबंध जपण्याला प्राधान्य द्यायला हवे,’’ असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी ‘स्वदेशी’चा नारा दिला. ‘‘देशातील नागरिकांनी स्वदेशीचा स्वीकार करण्याबरोबर स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, तीच खरी देशसेवा आहे,’’ असे आवाहनही त्यांनी केले. व्यापारी, उद्योजकांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे ते म्हणाले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह सत्तर देशांवर आयात शुल्क लादले असून, भारतीय उत्पादनांना अमेरिकेमध्ये २५ टक्के शुल्क द्यावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर, मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातील बनौली गावात झालेल्या सभेमध्ये स्वदेशी उत्पादनांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.
देशासाठी शेतकरी, लघुउद्योग आणि तरुणांचा रोजगार या सरकारसमोरील प्राधान्याच्या गोष्टी आहेत. त्याविषयी सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करत असून, नागरिकांचीही जबाबदारी आहे, असे नमूद करीत मोदी म्हणाले, ‘‘जागतिक अर्थव्यवस्था अस्थिर आणि अनिश्चित अवस्थेमध्ये आहे. या काळामध्ये देशाच्या हितसंबंधांवर लक्ष देण्याची गरज आहे.
भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर असून, आर्थिक प्राधान्यक्रमांविषयी आपण सावध असायला हवे. कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी, ती स्वदेशी आहे का, याचा विचार करायला हवा. ती वस्तू आपल्या लोकांच्या घामातून कौशल्यातून तयार झाली असेल, तर ती स्वदेशी आहे.
सर्व दुकानदार आणि व्यापाऱ्यांनीही आपल्या दुकानांमध्ये स्वदेशी उत्पादनेच असावीत, याचा आग्रह धरावा. भारतीय उत्पादनांना प्रोत्साहन देणे, हीच खरी देशसेवा आहे. आपल्या प्रत्येक कृतीमध्ये स्वदेशीची भावना असायला हवी आणि तेच महात्मा गांधींना खरे अभिवादनअसेल.’’
आपल्याला जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था व्हायची असेल, तर प्रत्येक राजकीय पक्ष आणि प्रत्येक नेत्याने मतभेद बाजूला ठेवून देशाच्या हितसंबंधांविषयी काम करायला हवे आणि नागरिकांच्या मनामध्ये ‘स्वदेशी’ची ज्योत पेटवायला हवी. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान.
‘भारताचे रौद्ररूप जगाने पाहिले’ : ‘‘जगाने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताचे रौद्ररूप पाहिले आहे. भारतावर हल्ला करणारा शत्रू पाताळातही लपला तरी तो वाचू शकत नाही, हेच दाखवून दिले,’’ असे गौरवोद्गार पंतप्रधान मोदी यांनी काढले. ‘‘आपली कारवाई यशस्वी होत असतानाच आपल्याच देशातील काही लोक विघ्ने आणत होते.
भारताने दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील अड्डे नष्ट केले, ही गोष्ट काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष सहन करू शकले नाहीत,’’ अशी टीका मोदी यांनी केली. तसेच, तुम्हाला ‘ऑपरेशन सिंदूर’चा अभिमान वाटत नाही का? असा प्रश्न त्यांनी यावेळी विरोधकांना उद्देशून विचारला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.