
नवी दिल्ली: देशातील मंत्र्यांची सरासरी मालमत्ता ३७.२१ कोटी रुपये असून, सर्व ६४३ मंत्र्यांची एकूण मालमत्ता २३,९२९ कोटी रुपये इतकी आहे. केंद्र सरकारमध्ये ७२ केंद्रीय मंत्र्यांपैकी सहा (८ टक्के) अब्जाधीश आहेत, असे ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’च्या (एडीआर) अहवालातून स्पष्ट झाले आहे.
भाजपमध्ये केंद्रात आणि राज्यांत सर्वाधिक १४ अब्जाधीश मंत्री आहेत. मात्र, हे त्यांच्या एकूण संख्येच्या केवळ ४ टक्के आहेत. काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर असून काँग्रेसच्या ६१ मंत्र्यांपैकी ११ (१८ टक्के) अब्जाधीश आहेत, तर तेलगू देसम पक्षाच्या २३ मंत्र्यांपैकी ६ (२६ टक्के) अब्जाधीश आहेत. आप, जनसेना पक्ष, जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना या पक्षांमध्येही अब्जाधीश मंत्री आहेत.
देशातील सर्वात श्रीमंत मंत्री म्हणजे आंध्र प्रदेशच्या गुंटूर मतदारसंघातून लोकसभेत प्रतिनिधित्व करणारे ‘टीडीपी’चे डॉ. चंद्रशेखर पेम्मसानी असून, त्यांची ५,७०५ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. कर्नाटकचे काँग्रेस डी. के. शिवकुमार दुसऱ्या क्रमांकावर असून, त्यांची मालमत्ता १,४१३ कोटी रुपयांहून अधिक आहे, तर तेलगू देसम पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांची मालमत्ता ९३१ कोटी रुपयांहून अधिक असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
त्रिपुराच्या ‘इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा’ पक्षाचे सुकला चरन नोआटिया यांनी फक्त दोन लाख रुपये मालमत्ता जाहीर केली आहे, तर तृणमूल काँग्रेसचे पश्चिम बंगाल मंत्री बिरबाहा हंसदा यांनी तीन लाख रुपयांपेक्षा किंचित अधिक मालमत्ता जाहीर केली आहे.
देशातील अब्जाधीशांपैकी ११ कर्नाटक राज्य मंत्रिमंडळांमध्ये आहेत. कर्नाटकमध्ये आठ अब्जाधीश मंत्री आहेत, त्यानंतर आंध्र प्रदेशात सहा आणि महाराष्ट्रात चार अब्जाधीश मंत्री आहेत. अरुणाचल प्रदेश, दिल्ली, हरियाना आणि तेलंगणात प्रत्येकी दोन अब्जाधीश मंत्री आहेत, तर गुजरात, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि पंजाबमध्ये प्रत्येकी एक अब्जाधीश मंत्री आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.