आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला.
ते म्हणाले की, ''टीव्ही चालू करताच तुम्हाला त्यावर मोदींचा फोटो दिसतो. ज्या घरात मोदींचा फोटो टीव्हीवर दिसतो ते घर गरिबीत जाते. पंतप्रधान मोदींना विकास नको आहे. पंतप्रधान मोदींना गरिबांचे कल्याण नको आहे. त्यांना आमच्या मुलांचे शिक्षण नको आहे कारण गरीब मुले शिक्षण घेऊन पुढे आली तर त्यांना प्रश्न विचारतील. त्यामुळे मोदी गरिबांच्या विरोधात आहेत. काँग्रेस पक्ष जेव्हा पुढे येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला दाबण्याचा प्रयत्न केला जातो.''
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे पुढे म्हणाले की, ''आज देशातील बेरोजगारी 45 वर्षांतील सर्वाधिक आहे. देशात दररोज महागाई वाढली आहे. हे सर्व मोदींच्या काळात घडले आहे. देशातील गरीब आणि श्रीमंतांमधील दरी संपू नये असे पंतप्रधान मोदींना वाटते. श्रीमंतांनी अधिक श्रीमंत व्हावे आणि गरीबांनी अधिक गरीब व्हावे, अशी मोदींची इच्छा आहे. मोदी म्हणाले होते की, मी दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देईन, मी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकीन, मी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करीन, शेतकऱ्यांना (Farmers) MSP देणार, पण तसे काहीही केले नाही. मोदी हे 'लबाडांचे स्वामी' आहेत.''
दुसरीकडे, काँग्रेस प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे मध्य प्रदेशातील धार येथे भारत जोडो न्याय यात्रेअंतर्गत आयोजित जाहीर सभेला संबोधित करत होते. त्यांनी भाजपवर शिवराजसिंह चौहान यांना बाजूला केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, ''भाजप नेते काँग्रेसबद्दल चुकीचे बोलतात. काही दिवसांपूर्वी शिवराजसिंह चौहान म्हणाले होते की, खर्गे आणि राहुल गांधी काँग्रेसला नष्ट करण्यासाठी एकत्र काम करत आहेत. भाजपने शिवराजसिंह चौहान यांना सत्तेवरुन का हटवले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.''
तर राहुल गांधी (Rahul Gandhi) आपल्या भाषणात म्हणाले की, ''थो़ड्या वेळापूर्वी मी एका व्हिडिओमध्ये पाहिला की भाजप नेता एका आदिवासी तरुणावर लघवी करत होता. हा कसला विचार आहे? ही भाजपची विचारधारा आहे. हे फक्त आदिवासींसोबतच घडत नाहीये… दलित, आदिवासी आणि गरिबांच्या बाबतीत होत आहे. मध्य प्रदेशात आदिवासींची लोकसंख्या 24 टक्के आहे आणि संपूर्ण देशात 8 टक्के आहे, पण देशातील मोठमोठ्या कंपन्यांच्या व्यवस्थापनाची लिस्ट पाहिल्यावर आदिवासी समाजातील एकही मालक सापडणार नाही.''
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.