Israel Iran War: इराणचे जोरदार प्रत्त्युत्तर! 100 हून अधिक ड्रोनद्वारे इस्राईलवर प्रतिहल्ला; संघर्ष वाढल्याने चिंतेचे वातावरण

Iran Israel conflict: इस्राईलच्या हल्ल्यानंतर इराणने संतप्त प्रतिक्रिया दिली असून या हल्ल्यांचा परिणाम त्यांना निश्‍चितच भोगावा लागेल, असा इशारा दिला आहे.
Iran reaction to Israel attack
Iran reaction to Israel attackDainik Gomantak
Published on
Updated on

तेहरान: इस्राईलच्या हल्ल्यानंतर इराणने संतप्त प्रतिक्रिया दिली असून या हल्ल्यांचा परिणाम त्यांना निश्‍चितच भोगावा लागेल, असा इशारा दिला आहे. इस्राईलच्या हल्ल्यानंतर इराणने शंभरहून अधिक ड्रोनद्वारे प्रतिहल्लाही केला. दरम्यान, इस्राईल आणि इराण यांच्यात तणाव वाढल्याने संयुक्त राष्ट्रांसह जगभरातील अनेक देशांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. भारतानेही संघर्ष वाढल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

इस्राईल्या हल्ल्यात तेहरानमध्ये अनेक इमारतींचे मोठे नुकसान झाले. इस्राईलच्या क्षेपणास्त्रांनी इराणच्या शस्त्रसाठ्यावरही मारा केला. इस्राईलला पूर्ण सुरक्षित करेपर्यंत आपली ही मोहीम सुरूच राहील, असा इशारा या देशाचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिला आहे.

इस्राईलच्या हल्ल्याचा निषेध करताना इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी या हल्ल्यात अनेक लष्करी अधिकारी आणि शास्त्रज्ञ ‘हुतात्मा’ झाल्याचे कबूल केले. इस्राईलने युद्ध छेडले असल्याचा आरोपही इराणने केला आहे.

यानंतर नेतान्याहू यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करत हल्ल्याचे समर्थन केले. इराणकडून अणुहल्ल्याचा धोका असल्यानेच आम्ही ‘रायझिंग लायन’ मोहीम राबविल्याचे नेतान्याहू यांनी सांगितले. नऊ अणुबाँब तयार करता येतील, एवढा युरेनियमचा साठा इराणने केला होता, असा दावाही त्यांनी केला.

इस्राईलने आजच्या हल्ल्यासाठी दोनशे लढाऊ विमानांचा वापर केल्याचे इस्राईलच्या लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडिअर जनरल एफी डेफ्रिन यांनी सांगितले. एकूण सहा ठिकाणांवरील शंभर लक्ष्यांवर मारा करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

हल्ला करताना इराणच्या अधिकाधिक जवळ जाण्यासाठी इस्राईलने हवेतच इंधन पुरविणाऱ्या विमानांचाही ताफ्यात समावेश केला होता. मात्र, या विमानांनी इराणची हद्द ओलांडली होती की नाही, ते स्पष्ट झालेले नाही. यानंतर इस्राईल, इराण, इराक आणि जॉर्डन यांनी आपली हवाई हद्द बंद केली आहे. या हल्ल्यानंतर दोन्ही देशांनी पुन्हा एकदा एकमेकांवर हल्ला करण्याचा इशारा दिला आहे.

इराणमधूनही केले हल्ले

इस्राईलची गुप्तचर संस्था ‘मोसाद’ने आजच्या हल्ल्याची पूर्वतयारी म्हणून इराणमध्ये गुप्तपणे ड्रोन नेले होते. तेथे मोक्याच्या ठिकाणी प्रचंड स्फोटके भरलेल्या ड्रोनचे उड्डाण करण्यासाठी जागाही तयार करून ठेवल्या होत्या. ड्रोनशिवाय, काही लक्ष्यवेधी हल्ले करू शकणारे क्षेपणास्त्रेही मध्य इराणमध्ये तैनात करण्यात आले होते. लष्करी वाहनांवरही क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आली होती. हवाई हल्ले सुरू होताच, इराणमधील यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली होती.

नवे लष्करप्रमुख नेमले

इस्राईलने वरिष्ठ अधिकारी मारल्यानंतर इराणने त्यांच्या जागी दुसऱ्या अधिकाऱ्यांची तातडीने नेमणूक केली आहे. लष्करप्रमुख महंमद बाघेरी यांच्याजागी जनरल अब्दुलरहिम मौसावी यांची, तर निमलष्करी दल असलेल्या रिव्होल्युशनरी गार्डचे प्रमुख हुसेन सलामी यांच्याजागी महंमद पाकपौर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इराणमध्ये लष्करापेक्षाही रिव्होल्युशनरी गार्डचे महत्त्व अधिक आहे.

नेतान्याहूंना अज्ञात स्थळी नेले

इराणकडून प्रतिहल्ला होण्याची शक्यता असल्याने इस्राईलने पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना अज्ञातस्थळी हलविले असल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. इराणकडून आज इस्राईलवर ड्रोनचा सातत्याने मारा होत असल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून नेतान्याहू यांना राजधानीतून बाहेर नेल्याचे समजते.

Iran reaction to Israel attack
Israel Airstrikes: इस्रायलचा गाझावर पुन्हा हवाई हल्ला, 24 तासांत 250 हून अधिक लोकांचा मृत्यू; मानवतावादी संकट अधिक गडद

इराणकडून ड्रोनचा मारा

इस्राईलच्या हल्ल्यानंतर इराणने तातडीने इस्राईलवर ड्रोनचा मारा केला. इराणचे शंभर ड्रोन आपल्या हवाई हद्दीतून इस्राईलच्या दिशेने गेल्याचे इराकने सांगितले. इस्राईलनेही ड्रोन हल्ले झाल्याचे मान्य करतानाच हे सर्व ड्रोन हवेतच नष्ट केल्याचा दावाही केला. इराणने सुमारे शंभर ड्रोन डागले होते, असेही इस्राईलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Iran reaction to Israel attack
Israeli Drug Dealer Arrest: इस्रायली 'अटाला'ला 5 दिवसांची पोलिस कोठडी! चरस, कोकेनसह इतर मुद्देमाल जप्त

ठळक घडामोडी

हल्ल्यात सहभाग नसल्याचेअमेरिकेकडून स्पष्ट

सौदी अरेबिया, पाकिस्तानकडूनहल्ल्याचा निषेध

तेहरानमध्ये अनेक इमारतींचे नुकसान

मारले गेलेले अधिकारी

लष्करप्रमुख जनरल महंमद बाघेरी

रिव्होल्युशनरी गार्डचे प्रमुख जनरल हुसेन सलामी

बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे प्रमुख जनरल अमिर अली हाजिजाद

सहा अणुशास्त्रज्ञ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com