
रविवारी रात्री आशिया कप २०२५ चा थरारक अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगणार आहे. या हाय-व्होल्टेज सामन्याची संपूर्ण क्रिकेट विश्वात उत्सुकता आहे. सोशल मीडियावरही भारत-पाकिस्तान सामन्याशिवाय इतर कोणत्याही गोष्टीची चर्चा नाही.
सुपर फोर फेरीत बांगलादेश आणि श्रीलंकेवर मात करत पाकिस्तान अंतिम फेरीत दाखल झाला आहे. दुसरीकडे, भारताने देखील दमदार कामगिरी करून फायनलमध्ये स्थान मिळवले आहे. या ऐतिहासिक लढतीकडे दोन्ही देशांसह जगभरातील चाहत्यांचे डोळे लागले आहेत.
दरम्यान, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने फायनलपूर्वी आपल्या खेळाडूंना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलताना अख्तर म्हणाला,
"पाकिस्तानने बांगलादेशविरुद्ध ज्या वृत्तीने आणि जिद्दीने सामना खेळला, त्याच मानसिकतेने भारताविरुद्ध उतरले पाहिजे. प्रतिस्पर्ध्यांचा अभिमान मोडण्याची वेळ आली आहे. फक्त बचावात्मक खेळ करून चालणार नाही, तर त्यांच्यावर आक्रमण करावे लागेल.
अख्तरने विशेषतः भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा हा पाकिस्तानसाठी सर्वात मोठा धोका असल्याचे नमूद केले. तो म्हणाला, "आपल्याला फक्त २० षटके पूर्ण करायची नाहीत, विकेट्स घ्याव्या लागतील. जर पाकिस्तानने पहिल्याच दोन षटकांमध्ये अभिषेक शर्माला बाद केले, तर भारतावर मोठा दबाव येईल. त्यांना चांगली सुरुवात मिळाली नाही तर त्यांच्या संपूर्ण डावावर परिणाम होईल."
तो पुढे म्हणाला, "सध्या भारतीय संघ सुरुवातीला मोकळेपणाने खेळत आहे आणि मोठ्या धावा करत आहे. पण अभिषेकची विकेट लवकर पडली, तर त्यांची धावगती घटेल आणि ते संघर्ष करतील."
भारत-पाकिस्तान सामने नेहमीच हाय-व्होल्टेज असतात आणि या सामन्याचीही उत्सुकता तितकीच प्रचंड आहे. एकीकडे भारत आपल्या अजेय फॉर्मवर अवलंबून आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानचा संघही सुपर फोरमधील विजयामुळे आत्मविश्वासाने भारलेला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.