Chandrayaan 3 Mission भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) सतीश धवन अवकाश केंद्रातून दुपारी दोन वाजून ३५ मिनिटांनी, एलव्हीएम३-एम४ (आधीचे जीएसएलव्ही मार्क-३) या प्रक्षेपकाद्वारे ‘चांद्रयान-३’चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
ही मोहीम यशस्वी झाल्यास अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनंतर भारत हा चंद्रावर उतरणारा चौथा तर दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच देश ठरेल. ‘चांद्रयान-३’मध्ये विक्रम लँडर, प्रग्यान बग्गी आणि प्रॉपल्जन मॉड्यूल असे तीन भाग आहेत.
विक्रम आणि प्रग्यान हे दोघेही चांद्रभूमीवर उतरून एक चांद्रदिवस म्हणजे पृथ्वीवरील १४ दिवस प्रयोग करतील. तर प्रॉपल्जन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून होणाऱ्या उत्सर्जनाचा अभ्यास करणार आहे.
‘चांद्रयान-३’ चा असा असेल प्रवास
प्रक्षेपणानंतर 16 मिनिटांनी ‘चांद्रयान-३’ पृथ्वीच्या ‘जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट’मध्ये (१७९ किमी बाय ३६५०० किमी कक्षेत) स्थिरावले. हे यान २२ दिवस पृथ्वीच्या कक्षेत फिरत राहणार आहे. या कालावधीत त्याची लंबवर्तुळाकार कक्षा टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येईल.
त्यानंतर सहा दिवसांचा प्रवास करून हे यान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. सुमारे १३ दिवस चंद्राच्या कक्षेत ते परिभ्रमण करेल.
या कालावधीत कक्षा कमी कमी करत चंद्रापासून १०० किलोमीटरच्या कक्षेत आल्यानंतर ‘प्रोपल्जन मॉड्यूल’पासून लँडर वेगळा होईल व चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरेल.
मोहिमेसाठी दक्षिण ध्रुवच का निवडला?
चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या प्रदेशात प्रकाश कधीच पोहोचत नाही. तेथील तापमान उणे २०० अंश सेल्सिअसपर्यंत असते. या भागात पाणी असल्याचे ‘चांद्रयान-१’ मोहिमेतून स्पष्ट झाले होते. त्यामुळे या भागात यान उतरविण्यात येणार आहे.
इतर देशांनी यापूर्वी पाठविलेली याने चंद्राच्या विषुववृत्ताच्या जवळ उतरली आहेत. ‘चांद्रयान-२’चा अनुभव लक्षात घेऊन यावेळी लँडिंग साईट चार किमी बाय अडीच किमी अशी करण्यात आली आहे. ‘चांद्रयान-२’मध्ये ती ५०० मीटर बाय ५०० मीटर होती.
चांद्र मोहिमेचे यावेळचे वेगळेपण
`चांद्रयान-२`मध्ये लँडर, बग्गी आणि ऑर्बिटर असे तीन भाग होते. तर ‘चांद्रयान-३’मध्ये ऑर्बिटर ऐवजी स्वदेशी प्रॉपल्जन मॉड्यूल आहे. या मॉड्यूलद्वारे लँडर आणि बग्गी चंद्राच्या पृष्ठभागावर सोडण्यात येणार आहे व ते चंद्रापासून १०० किलोमीटर उंचीवर फिरत राहणार आहे.
परस्पर दळणवळणासाठी याचा उपयोग होणार आहे. गरज भासली तर ‘चांद्रयान-२’च्या ऑर्बिटरची मदत घेतली जाणार आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर संशोधन
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारे चांद्रयान-३ हे पहिले यान असेल. कायम अंधारात असलेल्या या क्षेत्रात बर्फाच्या स्वरूपात पाणी असण्याची शक्यता आहे. पाण्याच्या शोधाबरोबरच तेथील पृष्ठभागाची संरचना यांचा अभ्यास करण्यात येणार आहे.
भविष्यातील चांद्र मोहिमा आणि मानवी मोहिमांसाठी याचा उपयोग होईल. अमेरिकेच्या आर्मेटिस-३ मोहिमेलाही या माहितीचा उपयोग होणार आहे.
आधीच्या दोन मोहिमा
‘चांद्रयान-1’ ने 2008 मध्ये ऑर्बिटरच्या साह्याने चंद्रावरील पाण्याच्या अस्तित्वाचा पुरावा जगासमोर आणला. पहिल्याच प्रयत्नात चंद्रापर्यंत पोहोचून इतिहास घडविला होता. ‘चांद्रयान-२’ या मोहिमेतील लॅंडर विक्रम चंद्रावर उतरण्याच्या शेवटच्या टप्प्यावर असताना सॅाफ्टवेअरमध्ये झालेल्या बिघाडामुळे तो चंद्रावर हळूवारपणे उतरण्याऐवजी आदळला.
भारताच्या अवकाश प्रवासातील एक नवा अध्याय ‘चांद्रयान-3’ मोहिमेने लिहिला आहे. प्रत्येक भारतीयाचे स्वप्न आणि महत्त्वाकांक्षेची ही मोठी भरारी आहे. ही महत्त्वपूर्ण कामगिरी आपल्या शास्त्रज्ञांच्या अथक समर्पणाचे उदाहरण आहे. त्यांच्या भावना आणि प्रतिभेला माझा सलाम.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.