
भोपाळ: भारतात जन्मलेल्या १६ चित्त्यांपैकी मुखी ही चित्त्याची मादी सोमवारी पूर्णपणे प्रौढ झाली असून प्रजननक्षम झाली असल्याची माहिती प्रोजेक्ट चिताचे संचालक उत्तम कुमार शर्मा यांनी सोमवारी दिली.
नामिबियातून मध्य प्रदेशातील कूनो राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आलेल्या ज्वाला या मादी चित्त्याच्या पोटी २९ मार्च २०२३ रोजी चार बछड्यांचा जन्म झाला होता त्यापैकी केवल एक मादीच जगू शकली. तिचे नाव मुखी असे ठेवण्यात आले होते. ही मुखी आता ३० महिन्यांची झाली असून ती भारतात जन्मलेल्या चित्त्यांपैकी प्रजननक्षम झालेली पहिली मादी चित्ता आहे.
१७ सप्टेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नामिबियाहून आणलेले आठ चित्ते कूनोच्या विशेष संरक्षित परिसरात सोडले होते. हा जगातील पहिला आंतरखंडीय मोठ्या मांसाहारी प्रजातीच्या पुनर्वसनाचा प्रयोग होता.
यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणखी १२ चित्ते भारतात आणण्यात आले. सध्या भारतात २७ चित्ते आहेत, त्यापैकी १६ भारतात जन्मलेले आहेत. यापैकी २४ कूनोमध्ये आणि तीन गांधीसागर अभयारण्यात आहेत, असे शर्मा यांनी सांगितले.
प्रकल्प सुरू झाल्यापासून आतापर्यंत १९ चित्त्यांचा (आफ्रिकेतून आलेले नऊ प्रौढ आणि भारतात जन्मलेली दहा पिल्ले) मृत्यू झाला आहे. तर, आतापर्यंत कूनोमध्ये २६ पिल्ले जन्मली आहेत. चित्त्यांच्या भारतातील पुनर्वसनाचा हा महत्त्वाकांक्षी प्रयोग यशस्वी ठरला असल्याची माहिती प्रोजेक्ट चिताच्या अधिकाऱ्यांनी दिली.
कूनोमधील पिल्लांचे एकूण जिवंत राहण्याचे प्रमाण ६१ टक्क्यांपेक्षा जास्त आहे, जे जागतिक स्तरावरील ४० टक्क्यांपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे, असेही प्रोजेक्ट चिताच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे भारतात आणखी चित्ते आणण्याबाबत आफ्रिकी देशांशी चर्चा सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.