

बंगळूर: मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा व कुलदीप यादव या आंतरराष्ट्रीय गोलंदाजांकडून सपशेल निराशा झाली. त्यामुळे भारत अ संघावर दुसऱ्या चारदिवसीय सामन्यात पराभवाची नामुष्की ओढवली. दक्षिण आफ्रिका अ संघाने ४१७ धावांचा यशस्वी पाठलाग करीत मालिका १-१ अशा बरोबरीत राखली.
मोहम्मद सिराज, आकाश दीप व कुलदीप यादव यांची दक्षिण आफ्रिकन संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. या तीन गोलंदाजांसह प्रसिध कृष्णा यानेही दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या या लढतीतील पहिल्या डावात चमक दाखवली; मात्र दुसऱ्या डावात या चारही गोलंदाजांकडून निराशा झाली.
मोहम्मद सिराजने १७ षटकांत ५३ धावा देत एक फलंदाज बाद केला. आकाश दीपने २२ षटकांत १०६ धावा देत एक फलंदाज बाद केला. प्रसिध कृष्णाने ४९ धावा देत दोन फलंदाज बाद केले. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर १७ षटकांमध्ये ८१ धावांची लूट करण्यात आली.
झुबेर हामझा (७७ धावा), तेंबा बावुमा (५९ धावा), कॉनर इस्टरह्युजेन (नाबाद ५२ धावा) यांनी निर्णायक क्षणी अर्धशतकी खेळी साकारत दक्षिण आफ्रिका अ संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या संघातील एकाही खेळाडूला शतक करता आले नाही; पण पाच खेळाडूंनी अर्धशतकी खेळी केली. यामुळे दक्षिण आफ्रिका अ संघाचा विजय निश्चित झाला.
संक्षिप्त धावफलक : भारत अ - पहिला डाव २५५ धावा. दक्षिण आफ्रिका अ - पहिला डाव २२१ धावा. भारत अ - दुसरा डाव सात बाद ३८२ धावा. दक्षिण आफ्रिका - दुसरा डाव पाच बाद ४१७ धावा (जॉर्डन हरमन ९१, लिसेगो सेनोक्वाने ७७, झुबेर हामझा ७७, तेंबा बावुमा ५९, मारकेस ॲकरमन २४, कॉनर इस्टरह्युजेन नाबाद ५२, टियान वॅन वुरेन नाबाद २०, प्रसिध कृष्णा २/४९).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.