
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना सध्या दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सुरू आहे. ११ ऑक्टोबर हा सामन्याचा दुसरा दिवस असून भारताने पहिल्या डावात दमदार खेळी करत ५१८/५ वर आपला डाव घोषित केला. प्रत्युत्तरादाखल फलंदाजीस उतरलेल्या वेस्ट इंडिजची सुरुवात अत्यंत खराब झाली. याच दरम्यान भारतीय क्षेत्ररक्षक साई सुदर्शनने घेतलेला एक झेल सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.
सामन्याच्या ८व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रवींद्र जडेजा गोलंदाजी करत होता. वेस्ट इंडिजचा सलामीवीर जॉन कॅम्पबेलने शक्तिशाली स्वीप शॉट मारला. तो चेंडू फलंदाजाच्या जवळ उडाला आणि तेथे तैनात असलेल्या साई सुदर्शनने विजेच्या वेगाने प्रतिक्रिया देत अविश्वसनीय झेल पकडला. साधारणपणे अशा झेलसाठी अतिशय चपळाई आणि अचूक वेळेची गरज असते. सुदर्शनने ती दाखवली आणि झेल घेतला.
प्राथमिक माहितीनुसार, झेल घेतल्यानंतर त्याच्या मनगटाला गंभीर दुखापत झाली असून त्याला तत्काळ मैदानाबाहेर नेण्यात आले. सध्या तो वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे.
या झेलपूर्वी, साई सुदर्शनने पहिल्या दिवशी भारतीय संघासाठी उत्कृष्ट फलंदाजी केली होती. त्याने १६५ चेंडूत ८७ धावा करत प्रभावी अर्धशतक झळकावले. त्याच्या खेळीत १२ चौकार होते. सुदर्शन आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक हुकला असला तरी त्याच्या संयमी आणि तांत्रिक खेळीने सर्वांना प्रभावित केले.
प्रथम फलंदाजी करताना भारताने यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांच्या शतकांच्या जोरावर मोठा स्कोर उभारला. जयस्वालने २५८ चेंडूत १७५ धावा, तर गिलने १९६ चेंडूत नाबाद १२९ धावा केल्या. तसेच नितीश रेड्डी (४३) आणि ध्रुव जुरेल (४४) यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. भारतीय संघाने १३४.२ षटकांत ५१८ धावांवर डाव घोषित केला.
प्रत्युत्तरादाखल, वेस्ट इंडिज संघाने आपला पहिला बळी अवघ्या २१ धावांवर गमावला. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमकता दाखवत कॅरिबियन फलंदाजांना दडपणाखाली ठेवले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.