United Nations Security Council: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) स्थायी सदस्यत्वासाठी भारत दीर्घकाळापासून प्रयत्नशील आहे. दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही भारताला निश्चितपणे UNSC चे स्थायी सदस्यत्व मिळेल असे म्हटले आहे. मात्र, यासाठी अधिक मेहनत घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व निश्चितपणे मिळेल, असे परराष्ट्रमंत्र्यांनी मंगळवारी सांगितले. भारताला हे सदस्यत्व नक्कीच मिळायला हवे, अशी भावना जगात आहे, मात्र यावेळी देशाला त्यासाठी अधिक मेहनत करावी लागणार आहे.
दरम्यान, गुजरातमधील राजकोटमध्ये एका कार्यक्रमात जयशंकर बोलत होते. यादरम्यान, उपस्थितांनी त्यांना UNSC चा कायमस्वरुपी सदस्य होण्याच्या भारताच्या संधींबद्दल विचारले. यावर जयशंकर म्हणाले की, ''संयुक्त राष्ट्राची स्थापना सुमारे 80 वर्षांपूर्वी झाली होती. पाच देशांनी (चीन, फ्रान्स, रशियन फेडरेशन, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स) सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य होण्याचा निर्णय घेतला.''
ते पुढे म्हणाले की, ''त्यावेळी जगात एकूण सुमारे 50 स्वतंत्र देश होते, जी संख्या कालांतराने सुमारे 193 पर्यंत वाढली.'' जयशंकर पुढे असेही म्हणाले की, "पण या पाच देशांनी आपले नियंत्रण कायम ठेवले. मात्र आता, तुम्हाला त्यांना या बदलाबाबत संमती देण्यास सांगावे लागेल. भारताच्या स्थायी सदस्यत्वासाठी काही देश सहमत आहेत, तर काही जण प्रामाणिकपणे त्यांचे मत व्यक्त करत आहेत, तर काही देश असेही आहेत जे पाठीमागून सतत काहीतरी करत राहतात."
जयशंकर पुढे म्हणाले की, हे सर्व अनेक वर्षांपासून सुरु आहे. परंतु, आता हे बदलले पाहिजे आणि भारताला स्थायी सदस्यत्व मिळाले पाहिजे, अशी भावना जगभरात निर्माण झाली आहे. ही भावना दरवर्षी वाढत असल्याचे मला दिसत आहे," जयशंकर म्हणाले की, "आम्ही ते नक्कीच साध्य करु. पण कठोर परिश्रमाशिवाय काहीही साध्य होत नाही. आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील.''
दुसरीकडे, भारत, जपान, जर्मनी आणि इजिप्त या देशांनी मिळून संयुक्त राष्ट्रासमोर एक प्रस्ताव मांडला असून यामुळे हे प्रकरण थोडे पुढे सरकेल असा विश्वास जयशंकर यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, "परंतु आपण दबाव आणला पाहिजे, आणि जेव्हा हा दबाव वाढतो... तेव्हा जगात अशी भावना निर्माण होते की संयुक्त राष्ट्र कमजोर झाला आहे. दुसरीकडे, रशिया युक्रेन आणि इस्त्रायल हमास यांच्यातील युद्ध थांबवण्याच्या प्रस्तावावरुन संयुक्त राष्ट्रांमध्ये गोंधळ उडाला. एकमत होऊ शकले नाही. मला वाटतं ही भावना जसजशी वाढत जाईल तसतशी आपल्या स्थायी सदस्यत्वाची मागणीला बळ मिळेल.''
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.