
नवी दिल्ली: अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कमी होण्याची आशा, वाढता भू-राजकीय तणाव आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेबाबतची वाढती चिंता यामुळे आज भारतीय बाजारात ९९.९ टक्के शुद्ध सोन्याचा भाव एक हजार रुपयांनी वाढून १,०७,०७० रुपये प्रति १० ग्रॅम या नव्या उच्चांकावर पोहोचला, तर चांदीचा भावही प्रति किलो १,२६,१०० रुपयांच्या उच्चांकावर स्थिरावला.
ऑल इंडिया सराफा असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीच्या बाजारपेठेत आज ९९.५ टक्के शुद्ध सोन्याचा भाव सलग आठव्या सत्रात वाढ नोंदवत, हजार रुपयांनी वाढून १,०६,२०० रुपयांवर (सर्व करांसह) पोहोचला.
९९.९ टक्के शुद्धता असलेल्या म्हणजे २४ कॅरेट सोन्याचा भाव मंगळवारी १,०६,०७० रुपयांवर बंद झाला होता, तर ९९.५ टक्के शुद्ध सोन्याचा भाव १,०५,२०० रुपयांवर स्थिरावला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात, स्पॉट गोल्ड ३,५४७.०९ डॉलर प्रति औंस या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचले.
‘‘फेडकडून दर कमी होण्याची आशा, वाढत्या भू-राजकीय तणाव आणि अमेरिकी अर्थव्यवस्थेभोवती वाढत्या चिंता यामुळे मागणी मजबूत राहिल्याने सोन्याच्या किमतीत वाढ होत आहे,’’ असे अबन्स फायनान्शियल सर्व्हिसेसचे सीईओ चिंतन मेहता म्हणाले.
‘‘या आठवड्याच्या शेवटी, ‘ओपेक’ची बैठक होईल, तर रशियाच्या पुरवठ्याबाबत चिंता कायम आहे कारण अलिकडच्या युक्रेनियन हल्ल्यामुळे रशियन तेल प्रक्रिया क्षमतेच्या १७ टक्के नुकसान झाले आहे, ज्यामुळे तेलाच्या किमती अलिकडच्या नीचांकी पातळीवरून परत आल्या आहेत,’’ मेहता म्हणाले. यामुळे महागाईचा आकडा, डॉलर कमकुवत होणे आणि सोन्याला आधार मिळणे यावर परिणाम होऊ शकतो.
धातुनिर्मिती क्षेत्राच्या शेअरमध्ये आलेली जोरदार तेजी आणि जीएसटी सुसूत्रीकरणाच्या अपेक्षेत ग्राहकोपयोगी क्षेत्रात झालेली खरेदी, यामुळे आज भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली.
आज सकाळी व्यवहार सुरू झाले तेव्हा शेअर बाजार संथ कल दाखवीत होते. ऐंशी हजारांचा स्तरही ‘सेन्सेक्स’ने कसाबसा सांभाळला. मात्र, नंतर शेवटच्या तासात खरेदी झाल्यामुळे निर्देशांक अर्धा टक्का वाढले. दिवसअखेर ४०९.८३ अंशांनी वाढलेला ‘सेन्सेक्स’ ८०,५६७.७१ अंशांवर स्थिरावला, तर १३५.४५ अंश वाढलेला ‘निफ्टी’ २४,७१५.०५ अंशांवर बंद झाला.
चीनने आज धातूंचा जादा पुरवठा थांबवण्यासाठी; तसेच त्यांच्या दरातील घसरण थांबवण्यासाठी उत्पादनावर निर्बंध लादण्याचे जाहीर केले. त्यामुळे भारतात धातूनिर्मिती कंपन्यांचे क्षेत्र तीन टक्क्यांच्या आसपास वाढले. टाटा स्टील पावणे सहा टक्के, जिंदाल स्टील साडेपाच टक्के, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया सव्वा पाच टक्के, तर हिंदुस्थान कॉपर पावणे पाच टक्के वाढला. ‘जीएसटी’च्या बैठकीत चांगले बदल होतील, या अपेक्षेत वाहननिर्मिती, औषधनिर्मिती ही क्षेत्रे आणि हॉटेल, पादत्राणे क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर वाढले.
जपानच्या सुमितोमो कंपनीला येस बँकेमध्ये २५ टक्के वाटा घेण्यास संमती मिळाल्याने त्या शेअरचे भाव वाढले.
मंगळवारी परदेशी वित्तसंस्थांनी १,१५९ कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले. तर भूराजकीय बदल आणि अमेरिकी आयातशुल्क अनिश्चिततेचे जागतिक वाढीवर होणारे परिणाम, यामुळे गुंतवणूकदार सावध आहेत, हे सोन्याच्या विक्रमी तेजीवरून दिसते, असे तज्ज्ञांनी सांगितले.
आज ‘सेन्सेक्स’मध्ये टाटा स्टील पावणेसहा टक्के वाढला. टायटन, महिंद्र आणि महिंद्र पावणेदोन टक्के वाढले. आयटीसी, एटर्नल, टाटा मोटर, ट्रेंट, स्टेट बँक, एचडीएफसी बँक, कोटक बँक, सन फार्मा एक टक्का वाढले, तर दुसरीकडे इन्फोसिस एक टक्का घसरला. एनटीपीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, टीसीएस, अदानी पोर्ट, एअरटेल या शेअरचे भावही घसरले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.