
Stampede In India: देशातील सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या मानवी चेंगराचेंगरीच्या (Stampede) वाढत्या घटनांनी चिंता वाढवली आहे. यंदाच्या वर्षात (2025) आतापर्यंत धार्मिक उत्सव, क्रीडा विजयोत्सव आणि राजकीय सभा अशा विविध क्षेत्रांतील चार मोठ्या दुर्घटनांनी एकापाठोपाठ एक देशाला हादरवून सोडले. प्रयागराजचा कुंभमेळा, गोव्यातील लईराई देवीची जत्रा, बंगळूरु संघाचा विजयोत्सव आणि आता तामिळनाडूतील अभिनेता थालापती विजयची रॅली या चार घटनांमध्ये झालेली जीवितहानी ही केवळ आकस्मिक दुर्घटना नसून व्यवस्थापन आणि नियोजनातील गंभीर त्रुटी दर्शवते. चला तर मग या चार घटनांविषयी जाणून घेऊया..
उत्तर गोव्यातील (Goa) शिरगाव येथे दरवर्षी आयोजित होणाऱ्या लईराई देवीच्या जत्रेत यावर्षी 2 मे रोजी रात्रीच्या पारंपरिक मिरवणुकीदरम्यान चेंगराचेंगरी झाली. अंदाजे 40 ते 50 हजार लोक या उत्सवात सहभागी झाले होते. या घटनेमागचे कारण पूर्णपणे भौगोलिक (Topographical) होते. मिरवणुकीदरम्यान एका ठिकाणी असलेला उतार (Slope) यामुळे गर्दी एकत्रितपणे वेगाने सरकू लागली. उतारावर वेग वाढल्याने लोक गोंधळले आणि त्यांचा तोल गेला. एकावर एक लोक पडू लागल्याने अनेक जण चिरडले गेले. या दुर्घटनेत 7 हून भाविकांनी आपला जीव गमावला.
प्रयागराज येथे 29 आणि 30 जानेवारी 2025 रोजी मौनी अमावस्येच्या अत्यंत शुभ दिवशी ही भीषण घटना घडली. लाखो भाविक पवित्र स्नान करण्यासाठी संगम स्थळी जमले असताना अचानक चेंगराचेंगरी झाली. रात्री 1 वाजताच्या सुमारास ही चेंगराचेंगरीची धक्कादायक घडली घडली. या दुर्घटनेत किमान 30 हून अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एवढ्या मोठ्या गर्दीसाठी अत्यंत कमी कालावधीत उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या पायाभूत सुविधा, गर्दीच्या मार्गातील त्रुटी आणि अनियंत्रित भाविकांचा अचानक झालेला लोंढा या दुर्घटनेला कारणीभूत ठरला.
आयपीएलच्या विजेतेपदासाठी तब्बल 17 वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आणणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) संघाच्या विजयोत्सवाला गालबोट लागले. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या खेळाडूंच्या सत्कार सोहळ्यासाठी लाखो चाहत्यांनी स्टेडियमबाहेर गर्दी केली होती. परंतु, ही गर्दी पोलिसांच्या पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेली. अनियंत्रित चाहत्यांनी आत प्रवेश करण्यासाठी धडपड सुरु केल्याने मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत दुर्दैवाने 11 हून अधिका लोकांचा मृत्यू, तर 33 जण जखमी झाले. क्रीडा विजयाच्या आनंदाचे व्यवस्थापन करताना सुरक्षा यंत्रणा कमी पडली.
सर्वात ताजी आणि गंभीर घटना तामिळनाडूमध्ये अभिनेता थालापथी विजयच्या राजकीय रॅलीत 27 सप्टेंबर रोजी संध्याकाळी घडली. तामिळनाडू वेत्री कळघम (TVK) चा अध्यक्ष असलेल्या अभिनेत्याच्या या राजकीय रॅलीत करुर येथे मोठ्या संख्येने लोक, विशेषतः महिला आणि मुले उपस्थित होते. प्रचंड गर्दी आणि नेत्याला जवळून पाहण्याच्या इच्छेमुळे चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. राजकीय सभांमध्ये सुरक्षा व्यवस्थेचे झालेले हे गंभीर उल्लंघन, राजकीय लाभासाठी सामान्य जनतेच्या जीविताची होणारी हेळसांड दर्शवते.
या चारही घटनांमध्ये कारणे भिन्न असली तरी, असुरक्षिततेचा धागा समान आहे.
1. उत्तरदायित्वाचा अभाव: प्रत्येक घटनेनंतर चौकशी समिती बसते, परंतु मागील अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी होत नाही.
2. गर्दी मॉडेलिंगचा अभाव: धार्मिक, राजकीय आणि उत्सवी गर्दीच्या भावनिक प्रवाहाचा अंदाज घेण्यासाठी तंत्रज्ञान आणि डेटा-आधारित नियोजन वापरले जात नाही.
३. प्रशिक्षण आणि अंमलबजावणीतील त्रुटी: तात्पुरती बॅरिकेडिंग व्यवस्था आणि स्वयंसेवकांवर गरजेपेक्षा जास्त अवलंबून राहणे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.