दिल्लीतील हनुमान जयंती दरम्यान शनिवारी जहांगीरपुरी (Delhi Jahangirpuri) परिसरात दोन समुदायांमध्ये हिंसाचार उसळला. वृत्तानुसार, दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये दोन समुदायांमध्ये जोरदार हाणामारी झाली. मिरवणूक काढताना दगडफेक करण्यात आली. पोलिसांसह अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना जहांगीरपुरी येथून बाबू जगजीवन राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जहांगीरपुरीतील मिरवणुकी दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचे (Amit Shah) वक्तव्य आले आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांचे विशेष पोलिस आयुक्त (Law and order) दीपेंद्र पाठक यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यांनी हिंसाचार पाहता आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ''ही पारंपारिक मिरवणूक होती आणि सुरक्षेसाठी पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले होते, परंतु ही मिरवणूक कुशल सिनेमा हॉलजवळ येताच दोन समुदायांमध्ये हाणामारी झाली. हिंसाचार रोखण्याचा प्रयत्न करताना घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस (Police) जखमी झाले. मिरवणुकीत पायी जाणाऱ्या लोकांवरही दगडफेक करण्यात आली आहे. काही ठिकाणाहूंन जाळपोळ झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आहेत. परिस्थिती नियंत्रणात असून अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या गदारोळात कोणते पोलीस जखमी झाले आहेत, याची पुष्टी केली जात आहे. या घटनेशी संबंधित काही व्हिडिओही समोर आले आहेत, ज्यामध्ये लोक दगडफेक आणि जाळपोळीच्या मागे धावताना दिसत आहेत. जाळपोळ आणि दगडफेकीच्या वेळी हेल्मेट घातलेले पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करताना दिसले. काही व्हिडिओंमध्ये तरुण दगडफेक करतानाही दिसत आहेत.''
तसेच, जाळपोळीच्या घटना पाहता दिल्ली अग्निशमन सेवेच्या 2 गाड्याही घटनास्थळी पोहोचल्या होत्या, मात्र दिल्ली अग्निशमन सेवेचे संचालक अतुल गर्ग यांनी घटना तुरळक असल्याचे सांगितले, त्यामुळे तिथून ऑपरेशन मागे घेण्यात आले. या जाळपोळीत बऱ्याच वाहनांचे नुकसान झाले. धुराच्या लोटातही शेकडो लोक तिथे दिसत होते.
या घटनाक्रमानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले, ''सर्व लोकांनी शांतता राखली पाहिजे. शांतता प्रस्थापित केल्याशिवाय देश प्रगती करु शकत नाही. प्रत्येकाने शांतता आणि सुव्यवस्था राखली पाहिजे. गरज पडली पोलीस आहेत. दिल्लीत शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. मी लोकांना शांतता राखण्याचे आवाहनही करेन.''
दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना म्हणाले की, ''उत्तर-पश्चिम जिल्ह्यातील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. जहांगीरपुरी आणि इतर संवेदनशील भागात अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.'' 'वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना परिसरात राहून कायदा आणि सुव्यवस्थेवर बारीक लक्ष ठेवून गस्त घालण्यास सांगण्यात आले आहे. दंगलखोरांवर कडक कारवाई केली जाईल,' असेही ते म्हणाले. त्यांनी सर्वसामान्यांना सोशल मीडियावरील अफवा आणि खोट्या बातम्यांकडे लक्ष देऊ नये असे सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.