भारतात 23 डिसेंबर हा शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी, भारताचे पाचवे पंतप्रधान, चौधरी चरण सिंह यांचा जन्म झाला होता, ज्यांनी शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्यासाठी अनेक धोरणे सुरू केली. सन 2001 मध्ये, भारत सरकारने चौधरी चरण सिंग यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 23 डिसेंबर हा शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. 1979 ते 1980 दरम्यान त्यांनी पंतप्रधान म्हणून काम केले.
याशिवाय भारतीय शेतकऱ्यांच्या (Farmers Day) योगदानाचा गौरव करण्यासाठी आणि देशातील त्यांचे महत्त्व वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तीन वादग्रस्त कृषी कायदे मागे घेतल्याच्या पार्श्वभूमीवर यंदा हा दिवस पाळला जात आहे. चौधरी चरणसिंग यांच्यामुळेच देशातील जमीनदारी प्रथा संपुष्टात आली. ते देशातील एक सुप्रसिद्ध शेतकरी नेते होते, ज्यांनी राष्ट्रीय राजकारणात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
चौधरी चरणसिंग यांनी तयार केलेले जमीनदारी निर्मूलन विधेयक राज्याच्या कल्याणकारी तत्त्वावर आधारित होते. त्यामुळे १ जुलै 1952 रोजी उत्तर प्रदेशात जमीनदारी प्रथा संपुष्टात आली आणि गरिबांना त्यांचे हक्क मिळाले. चौधरी चरणसिंग यांनी 1954 मध्ये शेतकऱ्यांसाठी उत्तर प्रदेश जमीन संवर्धन कायदा मंजूर केला आणि 3 एप्रिल 1967 रोजी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. यानंतर 17 एप्रिल 1968 रोजी त्यांनी पदाचा राजीनामा दिला आणि राज्यात पुन्हा निवडणुका झाल्या. त्यांनी या निवडणुका जिंकल्या आणि 17 फेब्रुवारी 1970 रोजी ते पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले.
चौधरी चरणसिंग यांचा जन्म 1902 मध्ये नूरपूर, मेरठ, उत्तर प्रदेश येथे एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी 1923 मध्ये विज्ञान विषयात बॅचलर डिग्री मिळवली, त्यानंतर 1925 मध्ये आग्रा विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मिळवली. ते कायद्याचे अभ्यासक आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभागी होते. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले चौधरी चरणसिंग हे देशातील शेतकऱ्यांशी मनापासून जोडलेले होते आणि त्यांना ग्रामीण भारतासाठी काम करायचे होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.