

आजच्या डिजिटल युगात मुलांच्या शिक्षणासाठी स्मार्टफोन ही काळाची गरज बनली असली, तरी त्यासोबत येणारे धोके दुर्लक्षित करून चालणार नाही. ऑनलाइन क्लास आणि प्रोजेक्टच्या नावाखाली मुले इंटरनेटच्या अशा जगात पोहोचू शकतात, जिथे अश्लील मजकूर, 'डीपफेक' आणि चुकीच्या माहितीचा धोका असतो.
अलीकडेच अमेरिकेत एका १४ वर्षीय मुलाने एआई (AI) चॅटबॉटच्या संपर्कात आल्यानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भारतातही जनरेशन-झेड (Gen-Z) मध्ये एआयचा वापर ६५ टक्क्यांनी वाढला आहे. अशा परिस्थितीत आपल्या पाल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी फोनमध्ये काही तांत्रिक बदल करणे अनिवार्य झाले आहे.
मुले अभ्यासासाठी सर्रास चॅटजीपीटी (ChatGPT) आणि गुगल जेमिनी (Gemini) वापरत आहेत. परंतु, या चॅटबॉट्सकडून चुकीची माहिती मिळू नये म्हणून पालकांनी 'फॅमिली अकाउंट'चा वापर करावा.
चॅटजीपीटीच्या सेटिंगमध्ये जाऊन 'पेरेंटल कंट्रोल' अंतर्गत मुलाचा ईमेल जोडावा, जेणेकरून त्यांची चॅट हिस्ट्री तुम्हाला पाहता येईल. गुगल जेमिनीसाठी 'फॅमिली लिंक' (Family Link) ॲप अत्यंत प्रभावी ठरते. या माध्यमातून मुले एआयला काय प्रश्न विचारत आहेत आणि त्यांना काय उत्तरे मिळत आहेत, यावर नियंत्रण ठेवता येते.
लहान मुलांमध्ये यूट्यूब सर्वात लोकप्रिय आहे. येथे मुलांसाठी स्वतंत्र प्रोफाइल तयार करणे आवश्यक आहे. यूट्यूबच्या सेटिंगमधील 'फॅमिली सेंटर'चा वापर करून तुम्ही अयोग्य सर्च आणि व्हिडिओ रिकमेंडेशन पूर्णपणे ब्लॉक करू शकता.
दुसरीकडे, इंस्टाग्रामवर 'सुपरविजन मोड' (Supervision for Teens) सक्रिय करा. यामुळे तुमचे मूल कोणत्या प्रकारचे एआय कॅरेक्टर्स किंवा व्यक्तींशी संवाद साधत आहे, हे तुम्हाला समजेल. तसेच, काही विशिष्ट शब्द (Keywords) ब्लॉक केल्यास तसा मजकूर मुलांच्या फीडमध्ये येणार नाही.
मुलांच्या फोनवर केवळ नजर ठेवण्यापेक्षा 'Watcher' किंवा 'Net Nanny' सारखी ॲप्स वापरणे अधिक फायदेशीर ठरते. ही ॲप्स पालकांना एक 'व्हर्च्युअल डोळा' देतात, ज्याद्वारे मुलाच्या फोनवर येणारे नोटिफिकेशन्स, त्यांची लाईव्ह लोकेशन आणि कोणत्या ॲपवर किती वेळ खर्च होत आहे, याची इत्थंभूत माहिती मिळते.
'Canopy' सारखे ॲप्स एआयच्या मदतीने फोटो आणि मजकुरातील अश्लील भाग ओळखून तो आपोआप ब्लॉक करतात. मुलांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी पालकांनी या तांत्रिक सुरक्षा कवचाचा वापर करणे ही काळाची गरज आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.