मुंबई : देशातील सर्वात मोठा बँक घोटाळा एबीजी शिपयार्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने पुन्हा छापेमारी करत आज मुंबई, पुणे आणि सुरतमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. मात्र, आतापर्यंत या छापेमारी संदर्भात फारशी माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई, पुणे आणि सुरतसह 26 ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. (ED raids Mumbai, Pune and Surat in ABG Shipyard Bank fraud )
प्राप्त माहितीनुसार एकूण 28 बँकांची तब्बल 22 हजार 842 कोटी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच संचालनालयाच्या पथकांनी तीन शहरांमध्ये जवळपास 26 ठिकाणी छापे टाकले शोधमोहीम सुरू केली आहे. या प्रकरणी फेब्रुवारीमध्ये सीबीआयने एबीजी शिपयार्ड लिमिटेड आणि तिचे तत्कालीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी अग्रवाल यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
आरोप असलेली एबीजी शिपयार्ड लिमिटेड कंपनीची सुरुवात 1985 साली झाली. गुजरातमधील दहेज आणि सुरत येथे जलवाहिन्यांच्या बांधकाम आणि दुरुस्तीमध्ये गुंतलेली आहे. आतापर्यंत या कंपनीने165 जहाजे बांधली आहेत. 1991 पर्यंत या कंपनीला देश-विदेशातून प्रचंड ऑर्डर्स मिळाल्या आहेत. ज्यात प्रचंड नफा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्टेट बँकेच्या तक्रारीनुसार या कंपनीने बँकेकडून 2,925 कोटी रुपयांचे कर्ज घेतले. याशिवाय आयसीआयसीआय बँकेकडून 7,089 कोटी रुपये, आयडीबीआय बँकेकडून 3,634 कोटी रुपये, बँक ऑफ बडोदाकडून 1,614 कोटी रुपये, पंजाब नॅशनल बँकेकडून 1,244 कोटी रुपये, इंडियन ओव्हरसीज बँकेकडून 1,228 कोटी रुपये कर्ज घेण्यात आले आहे. अशा प्रकारे कंपनीने एकूण 28 बँकांकडून कर्ज घेतले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.