Viral Video: व्हायरल होण्याच्या नादात थेट मृत्यूलाच आमंत्रण! चालत्या ट्रकच्या चाकांमध्ये घुसवली गाडी; थरारक व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना संताप अनावर
Dangerous Bike Stunt Viral Video: आजकालच्या काळात सोशल मीडियावर 'व्हायरल' होण्याचे भूत अनेकांच्या डोक्यात असे काही बसले आहे की, त्यापुढे त्यांना स्वतःच्या जिवाची किंमतही उरलेली दिसत नाही. जास्तीत जास्त लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी तरुण पिढी आजकाल कोणत्याही थराला जात असून स्वतःचा जीव धोक्यात घालताना मागे-पुढे पाहत नाही.
जर तुम्ही सोशल मीडियावर नियमित सक्रिय असाल, तर अशा जीवघेण्या स्टंटबाजीचे अनेक व्हिडिओ तुमच्या नजरेखालून गेले असतील. सध्या अशाच एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो पाहून कोणाचेही काळीज धडधडल्याशिवाय राहणार नाही. या तरुणाने प्रसिद्धीसाठी जे धाडस केले, ते धाडस नसून थेट मृत्यूला दिलेले आमंत्रण आहे असेच म्हणावे लागेल.
या व्हायरल व्हिडिओमध्ये (Video) असे दिसते की, रात्रीच्या वेळी रस्त्यावरुन एक ट्रक आपल्या वेगाने जात आहे. अशातच तिथे एक दुचाकीस्वार येतो. विशेष म्हणजे, अशा धोकादायक रस्त्यावरही त्याने हेल्मेट घातलेले नाही. हा तरुण सुरुवातीला ट्रक ड्रायव्हरच्या केबिनजवळ जातो आणि त्याला काहीतरी बोलतो. त्यानंतर तो आपल्या दुचाकीचा वेग थोडा कमी करतो आणि कल्पनेपलीकडची एक भयंकर कृती करतो. हा दुचाकीस्वार आपली गाडी चक्क चालत्या ट्रकच्या मधल्या भागात, म्हणजेच पुढच्या आणि मागच्या चाकांच्या मध्ये नेतो. ट्रक वेगात असताना हा तरुण त्या ट्रकच्या चाकांच्या अगदी जवळ आपली दुचाकी चालवताना दिसतो.
ट्रकच्या चाकांच्या मध्ये दुचाकी चालवण्याचा हा स्टंट अत्यंत धोकादायक आहे. विचार करा, जर त्या ठिकाणी ट्रकचा वेग थोडा जरी कमी-जास्त झाला असता किंवा रस्त्यात एखादा छोटा खड्डा जरी आला असता, तरी त्या तरुणाचा जागीच चक्काचूर झाला असता. मात्र, या धोक्याची जाणीव त्या तरुणाला अजिबात दिसत नाही. हा व्हिडिओ 'एक्स'वर @Ramraajya नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
बातमी लिहिपर्यंत हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला असून त्यावर संतापजनक प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. हा व्हिडिओ पाहून एका युजरने संताप व्यक्त करत लिहिले की, "आता अशा लोकांना काय बोलावे तेच समजत नाही." दुसऱ्या एकाने लिहिले, "याला म्हणतात निव्वळ मूर्खपणा! हा तरुण थेट मृत्यूला आमंत्रण देत आहे. आयुष्य एकदाच मिळते, किमान त्याचे तरी भान ठेवावे." तर काही युजर्संनी उपरोधिक टोला लगावत म्हटले की, "अशा 'शूर' लोकांची भरती थेट सैन्यात करायला हवी, देशाला यांचीच गरज आहे."
त्याचवेळी, या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा रस्ते सुरक्षा आणि सोशल मीडियाचा (Social Media) वाढता गैरवापर यावर चर्चा सुरु झाली आहे. केवळ काही सेकंदांच्या प्रसिद्धीसाठी आपला मौल्यवान जीव धोक्यात घालणे किती योग्य आहे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. अशा स्टंटबाजांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे, जेणेकरुन भविष्यात कोणाचीही असे धाडस करण्याची हिंमत होणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

