

केंद्र सरकारच्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष सध्या महागाई भत्ता (Dearness Allowance - DA) वाढीच्या घोषणेकडे लागले आहे. दरवर्षी जानेवारी आणि जुलैपासून महागाई भत्त्यात सुधारणा लागू केली जाते. मात्र, जुलै 2026 पासून लागू होणाऱ्या संभाव्य वाढीबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसल्याने कर्मचारी वर्गामध्ये उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे पुढील वाढ कधी जाहीर होणार आणि कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होऊ शकते, याबाबत चर्चा रंगू लागली आहे.
यंदाच्या जानेवारीपासून केंद्र सरकारने महागाई भत्ता 58 टक्क्यांवरून 60 टक्क्यांपर्यंत वाढवला होता. त्यानंतर आता जुलैच्या हप्त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. औद्योगिक कामगारांसाठीच्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (AICPI-IW) अलीकडील आकडेवारीत सातत्याने वाढ दिसून आल्याने यावेळी महागाई भत्त्यात आणखी 3 ते 4 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अंतिम निर्णयासाठी जून महिन्याच्या निर्देशांकाची आकडेवारी महत्त्वाची ठरणार आहे.
जुलै महिन्यात महागाई भत्त्याची घोषणा झाली नाही, तरी कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी चिंता करण्याची गरज नाही. मागील काही वर्षांचा अनुभव पाहता, केंद्र सरकारने अनेकदा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात महागाई भत्त्याची वाढ जाहीर केली आहे. त्यामुळे यंदाही दिवाळीपूर्वी सरकारकडून DA वाढीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना वाढीव भत्त्याची रक्कम थकबाकीसह (Arrears) मिळू शकते
महागाई भत्त्यातील वाढ ही केवळ मासिक पगार वाढवणारी नसून तिचा परिणाम पेन्शन, भविष्य निर्वाह निधी (PF), ग्रॅच्युइटी तसेच इतर अनेक भत्त्यांवरही होत असतो. त्यामुळे DA वाढीचा लाभ देशभरातील सुमारे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि जवळपास 65 लाख पेन्शनधारकांना मिळणार आहे. संरक्षण दल, रेल्वे आणि विविध केंद्रीय विभागांतील कर्मचारीही या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, प्रत्येक कर्मचाऱ्याला मिळणारी वाढ ही त्याच्या मूळ वेतन आणि वेतनश्रेणीनुसार वेगवेगळी असेल.
महागाई भत्त्यासोबतच 8व्या वेतन आयोगाबाबतही कर्मचारी वर्गामध्ये मोठी उत्सुकता आहे. विविध अहवालांनुसार आयोगाच्या शिफारशी 2027 च्या सुरुवातीला किंवा मध्यावधीत सादर होण्याची शक्यता आहे. मात्र, त्या प्रत्यक्षात लागू होण्यासाठी आणखी काही वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे 2029 किंवा 2030 पर्यंतच कर्मचाऱ्यांना नव्या वेतन आयोगाचा संपूर्ण लाभ मिळण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
सध्या तरी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष जून महिन्याच्या AICPI-IW निर्देशांकाच्या आकडेवारीकडे आणि त्यानंतर केंद्र सरकारकडून होणाऱ्या अधिकृत घोषणेकडे लागले आहे. DA वाढीबाबतचा अंतिम निर्णय जाहीर झाल्यानंतरच पगार आणि पेन्शनमध्ये किती वाढ होणार, याचे स्पष्ट चित्र समोर येईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.