Mandous Cyclone Updates : गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारत वगळता उर्वरित भागांमध्ये थंडीच्या लाटेचा प्रकोप दिसत नाहीए. समुद्री वाऱ्यांचा वेग मंदावल्यामुळं बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून दक्षिणेतील काही राज्यांना पुन्हा एकदा चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे.
बंगालच्या उपसागरात मेंडोस नावाचे चक्रीवादळ तयार झाले आहे. त्यामुळे पोंडिचेरी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये हवामान खात्याने हाय अलर्ट जारी केला आहे. या चक्रीवादळामुळे तिन्ही राज्यांमध्ये मुसळधार पावसासोबत वादळी वारेही वाहत आहेत. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून तिथल्या शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच स्थानिकांना देखील सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. हे चेन्नईपासून 900 किमी आग्नेयेस जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर तिन्ही राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान याचा गोवा आणि महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नसला तरी दमट आणि ढगाळ वातावरण तसेच काही तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तामिळनाडूच्या 13 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हे वादळ पश्चिम-वायव्य दिशेने सरकत आहे. याचे हळूहळू चक्रीवादळात रूपांतर होत आहे. आज हे वादळ नैऋत्य बंगालचा उपसागर, उत्तर तामिळनाडू-पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनार्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यानंतर ते तामिळनाडू, पुद्दुचेरी ओलांडून 10 डिसेंबरला आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकेल. या दरम्यान वाऱ्याचा वेग 65 किमी प्रतितास ते 85 किमी प्रतितास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.