पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारी बीबीसी डॉक्युमेंटरी शेअर करणारे ट्विट ब्लॉक करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. ज्या ट्विटद्वारे बीबीसी डॉक्युमेंटरीची यूट्यूब लिंक शेअर करण्यात आली, ती देखील ब्लॉक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने याबाबत सूचना जारी केल्या आहेत.
(Centre Blocks Tweets, Videos Of BBC Documentary Critical Of PM )
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बीबीसी डॉक्युमेंट्रीच्या पहिल्या एपिसोडचे यूट्यूबवर शेअर केलेले सर्व व्हिडिओ ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. ‘इंडियाः द मोदी क्वेश्चन’ या बीबीसी डॉक्युमेंटरीच्या यूट्यूब व्हिडीओच्या लिंक असलेल्या 50 हून अधिक ट्विट ब्लॉक करण्याचे आदेश ट्विटरला देण्यात आले आहेत.
माहिती आणि प्रसारण सचिवांनी IT नियम, 2021 अंतर्गत आणीबाणीच्या अधिकारांचा वापर करून शुक्रवारी याबाबत सूचना जारी केल्या. YouTube आणि Twitter या दोन्ही कंपन्यांनी या निर्देशांचे पालन केले आहे.
ही डॉक्युमेंट्री ब्रिटनच्या सार्वजनिक प्रसारक ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने (बीबीसी) बनवली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने वस्तुनिष्ठतेचा अभाव आणि वसाहतवादी वृत्ती दर्शविणारा "प्रोपोगंडा" असे त्याचे वर्णन केले आहे.
यूट्यूबने आपल्या प्लॅटफॉर्मवर पुन्हा व्हिडिओ अपलोड करण्यापासून रोखण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. ट्विटरने इतर प्लॅटफॉर्मना देखील व्हिडिओंच्या लिंक्स असलेले ट्विट तपासून ब्लॉक करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.