CBI Summons Tejashwi Yadav: जमिन घेऊन नोकरी दिल्याप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी वाढत आहेत. सीबीआयने यापूर्वी लालूप्रसाद यादव आणि त्यांची पत्नी राबडी देवी यांची चौकशी केली होती.
त्यानंतर आता या प्रकरणात लालुंचे पुत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची चौकशी सीबीआय करणार आहे.
या प्रकरणी सीबीआयने तेजस्वी यादव यांना दुसऱ्यांदा समन्स पाठवले आहे. तेजस्वी यादव यांना शनिवारी (11 मार्च) चौकशीसाठी दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात बोलावण्यात आले आहे.
सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, यापूर्वी तेजस्वी यादव यांना 4 फेब्रुवारीला चौकशीसाठी दिल्लीत बोलावले होते आणि त्यासाठी त्यांना समन्स पाठवले होते, परंतु सध्या सुरू असलेल्या विधानसभा अधिवेशनाचा दाखला देत ते दिल्लीत आले नाहीत. त्यामुळे आता त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे.
दिल्ली, मुंबई ते पाटण्यापर्यंत छापेमारी
या नोकरी घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या पथकांनी शुक्रवारी दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि पाटणामधील 20 हून अधिक ठिकाणी छापे टाकले होते. यात लालूप्रसाद यांच्या मुलींच्या घरावरही छापा टाकला होता. यासोबतच तेजस्वी यांच्या दिल्लीतील घरावर छापा टाकला होता.
येथून कागदपत्रे जप्त केली आहेत. ईडीच्या छाप्याच्या एका दिवसानंतर सीबीआयने तेजस्वी यादव यांना चौकशीसाठी बोलावले आहे. ईडीच्या छाप्यांमध्ये 53 लाख रुपये रोख, USD 1900, सुमारे 540 ग्रॅम सोने आणि 1.5 किलो सोन्याचे दागिने मिळाले.
या प्रकरणात सीबीआयने लालूप्रसाद यादव, त्यांची पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि अन्य 14 जणांविरुद्ध गुन्हेगारी कट आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींखाली आरोपपत्र दाखल केले आहे. राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने सर्व आरोपींना 15 मार्चला हजर राहण्यास सांगितले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.