Manish Sisodia Arrested: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी दिल्लीतील मद्य धोरण प्रकरणात सीबीआयने अटक केली. सीबीआयने दीर्घ चौकशीनंतर सिसोदिया यांना अटक केली आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वीच दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मनिष सिसोदियांना अटक होईल, असा अंदाज व्यक्त केला होता.
सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीचे अबकारी धोरण ठरविण्यात सिसोदिया यांची महत्वाची भूमिका होती. सूत्रांच्या माहितीनुसार सिसोदिया यांच्यावर पुरावे नष्ट केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. सिसोदिया यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत.
हेच सिसोदिया यांच्या अटकेचे कारण ठरले. सिसोदिया यांना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. सिसोदिया सीबीआय कार्यालयात सुमारे 15 मिनिटे उशिरा पोहोचले. सीबीआय कार्यालयात त्यांची ८ तास चौकशी झाली.
चौकशीत सहभागी होण्यासाठी घरी जाण्यापूर्वी सिसोदिया यांनी आपल्या आईची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. यानंतर रोड शो करत ते सीबीआय कार्यालयात पोहोचले. तत्पुर्वी त्यांनी महात्मा गांधींची समाधी असलेल्या राजघाट येथे दर्शन घेतले घरातून बाहेर पडताना त्यांनी व्हिक्टरी चिन्हही दाखवले होते.
सिसोदिया यांच्यासोबत त्यांचे हजारो समर्थक होते. सर्वजण मुख्यालयाजवळ धरणे धरून बसले आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. दरम्यान, या परिसरात पोलिसांनी कलम 144 लागू केले.
सीबीआय कार्यालयात पोहोचण्यापूर्वी लोकांना उद्देशून सिसोदिया म्हणाले होते की, मी जेव्हा टीव्ही चॅनलमध्ये अँकर होतो. चांगला पगार होता, आयुष्य चांगले चालले होते. सर्व काही सोडून केजरीवाल यांच्यासोबत आलो. झोपडपट्टीत काम करू लागलो.
आज मला तुरुंगात पाठवत आहेत, तेव्हा माझी पत्नी घरी एकटी असेल. ती खूप आजारी आहे. मुलगा विद्यापीठात शिकतो. भगतसिंग देशासाठी फासावर गेले, तुरुंगात जाणे ही छोटी बाब आहे. काही महिने तुरुंगात राहावे लागले तरी पर्वा नाही. खोट्या आरोपांमुळे तुरुंगात जाणे ही छोटी गोष्ट आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.