Lancet Report: कर्करोग हा असा आजार आहे, त्याचे नाव ऐकून लोक थरथर कापतात. मात्र तो किती वेगाने पसरत आहे? हे यावरुन समजू शकते की एका वर्षात भारतात कर्करोगाने ग्रस्त 9 लाख लोकांचा मृत्यू झाला. लॅन्सेटच्या अहवालानुसार हा आकडा 2019 मधील आहे. 2019 मध्ये भारतात कर्करोगाचे 12 लाख नवीन रुग्ण आढळले, तर 9.3 लाख लोकांचा कर्करोगामुळे मृत्यू झाल्याचे या अभ्यासात म्हटले आहे. ‘द लॅन्सेट रिजनल हेल्थ साउथईस्ट एशिया’ या नियतकालिकात नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात ही बाब समोर आली आहे. संशोधकांना असे आढळून आले की, कर्करोगाच्या वाढत्या घटना आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या बाबतीत चीन आशियामध्ये आघाडीवर आहे.
दरम्यान, कम्युनिस्ट देश चीनमध्ये कॅन्सरचे सर्वाधिक 48 लाख नवीन रुग्ण आढळून आले आणि 27 लाख लोकांचा मृत्यू झाला. जपानमध्ये कॅन्सरची जवळपास नऊ लाख नवीन प्रकरणे नोंदवली गेली आणि 4.4 लाख मृत्यू झाले. संशोधकांच्या मते, 2019 मध्ये आशियामध्ये कर्करोग हा सार्वजनिक आरोग्यासाठी एक महत्त्वपूर्ण धोका बनला होता, जिथे 94 लाख नवीन प्रकरणे नोंदवली गेली आणि 56 लाख लोक मरण पावले. संशोधकांच्या आंतरराष्ट्रीय टीममध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कुरुक्षेत्र आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस जोधपूर आणि भटिंडा येथील संशोधकांचाही समावेश होता.
त्यांनी त्यांच्या अभ्यासात सांगितले की, 'आम्ही 1990 ते 2019 दरम्यान आशियातील 49 देशांमध्ये 29 प्रकारच्या कर्करोगाच्या नमुन्यांचे परीक्षण केले.' संशोधकांच्या मते, आशियातील कर्करोग श्वासनलिका, ब्रोन्कस आणि फुफ्फुसांमध्ये (TBL) सर्वात जास्त आढळतो. अंदाजे 13 लाख प्रकरणे नोंदवली गेली आणि 12 लाख लोक मरण पावले. या अवयवांच्या कर्करोगाची सर्वाधिक प्रकरणे पुरुषांमध्ये आढळून आली. संशोधकांनी नोंदवले की, गर्भाशयाच्या कर्करोग होण्याचे प्रमाण (महिलांमध्ये) अनेक आशियाई देशांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आणि पहिल्या पाचमध्ये आहे. 2006 मध्ये सादर करण्यात आलेली ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) लस, रोग रोखण्यासाठी आणि HPV-संबंधित मृत्यू कमी करण्यासाठी प्रभावी सिद्ध झाली आहे.
दरम्यान, कर्करोगासाठी जबाबदार असलेल्या 34 घटकांपैकी धूम्रपान, मद्यपान आणि प्रदूषक कण हे प्रमुख घटक असल्याचे आढळून आले. अभ्यासात म्हटले आहे की, 'आशियातील वाढत्या वायू प्रदूषणामुळे कर्करोगाचे प्रमाण चिंताजनक आहे.' संशोधकांच्या मते, बांगलादेश, नेपाळ आणि भारतासारख्या दक्षिण आशियाई देशांमध्ये खैनी, गुटखा, पान मसाला या स्वरुपात तंबाखूचे सेवन चिंतेचा विषय आहे. 2019 मध्ये जगभरातील एकूण मृत्यूंपैकी 32.9 टक्के मृत्यू भारतात होते आणि ओठ आणि तोंडाच्या कर्करोगाच्या 28.1 टक्के नवीन प्रकरणांची नोंद झाली होती. ते पुढे म्हणाले की, 'तोंडाच्या कर्करोगाच्या 50 टक्क्यांहून अधिक प्रकरणे तंबाखूच्या सेवनाशी संबंधित आहेत. अलीकडच्या काळात भारतात त्याचा ट्रेंड वाढला आहे.'
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.