

Border 2 Teaser Video: भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेल्या 'बॉर्डर' (1997) या चित्रपटाच्या सिक्वेलची प्रेक्षक गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करत होते. अखेर ती प्रतीक्षा संपली. आज, 16 डिसेंबर 2025 रोजी 'विजय दिनी' (Vijay Diwas) औचित्य साधून 'बॉर्डर 2' चा बहुप्रतिक्षित टीझर अधिकृतरित्या प्रदर्शित करण्यात आला. या टीझरने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला असून पुन्हा एकदा देशात देशभक्तीचे वादळ घोंगावणार असल्याचे स्पष्ट झाले.
टीझरची सुरुवात सनी देओलच्या (Sunny Deol) पहाडी आवाजातील एका जबरदस्त संवादाने होते: "तुम जहाँ से भी घुसने की कोशिश करोगे, आसमान से जमीन से समुंदर से, सामने एक हिंदुस्तानी फौजी खड़ा पाओगे, जो आँखों में आँखें डालकर कहेगा, हिम्मत है तो आगे आ, ये खड़ा है हिंदुस्तान।" हा संवाद ऐकताना अंगावर शहारे येतात.
टीझरचा शेवटही तितकाच रोमांचक आहे, जिथे सनी देओल विचारतो, "आवाज कहाँ तक जानी चाहिए?" आणि स्वतःच उत्तर देतो, "लाहौर तक!" मेजर कुलदीप सिंह यांच्या भूमिकेत सनी देओल पुन्हा एकदा पडद्यावर डरकाळी फोडताना दिसत आहे.
टीझरमध्ये हाय-ऑक्टेन ॲक्शन शत्रूंवर गोळ्यांसारखे बरसणारे संवाद आणि ओतप्रोत भरलेली देशभक्ती पाहायला मिळते. केवळ सनी देओलच नाही, तर वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांची उपस्थिती चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. या तिन्ही अभिनेत्यांचा धाकड अंदाज आणि सैनिकाच्या वर्दीतील त्यांची पर्सनालिटी प्रेक्षकांना आकर्षित करत आहे.
'बॉर्डर 2' हा चित्रपट 19997 मधील मूळ चित्रपटाचा सिक्वेल आहे. जे.पी. दत्ता यांच्या मूळ चित्रपटाने जो वारसा निर्माण केला होता, तोच वारसा पुढे नेण्याचे काम हा चित्रपट करणार आहे. हा चित्रपट 23 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) मुहूर्तावर जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. पोस्टर आणि आता रिलीज झालेल्या टीझरमुळे सोशल मीडियावर या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. विश्लेषकांच्या मते, हा चित्रपट 2026 मधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरु शकतो.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'बॉर्डर 2' चे अंदाजित बजेट 250 ते 300 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. इतक्या मोठ्या बजेटमुळे या चित्रपटाचा कॅनव्हास अतिशय भव्य असणार आहे. 'केसरी' सारखा सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक अनुराग सिंह या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. जे.पी. दत्ता, निधी दत्ता आणि भूषण कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.