

Software Engineer Couple Death Bengaluru: आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरु शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली. कोथानूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअर दाम्पत्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. भानू चंद्र रेड्डी आणि त्यांची पत्नी शाझिया अशी मृतांची ओळख पटली. दोघेही मूळचे तेलंगणाचे रहिवासी असून बंगळुरुमध्ये नामांकित खासगी कंपन्यांमध्ये आयटी प्रोफेशनल म्हणून कार्यरत होते. सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या या दाम्पत्याने अचानक हे टोकाचे पाऊल का उचलले, या प्रश्नाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या आत्महत्येचे स्वरुप अत्यंत भीषण होते. पतीने प्रथम घरामध्ये गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. पतीचा मृतदेह सापडल्यानंतर काही वेळातच पत्नी शाझियाने अपार्टमेंटच्या 17व्या मजल्यावरुन खाली उडी मारुन आत्महत्या केली. एकामागून एक घडलेल्या या दोन घटनांमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच कोथानूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला.
या दाम्पत्याच्या आत्महत्येमागे नेमकं काय कारण असावं, याचा शोध पोलीस घेत आहेत. सुरुवातीच्या तपासात असे समोर आले की, भानू आणि शाझिया यांच्या वैवाहिक जीवनात गेल्या काही काळापासून मोठे वाद आणि मतभेद सुरु होते. त्यांच्या लग्नाला साधारण 9 वर्षे झाली होती. लग्नापूर्वी ते काही काळ लिव्ह-इन रिलेशनशिपमध्येही राहिले होते, परंतु लग्नानंतर त्यांच्यात वारंवार भांडणे होत असत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या कौटुंबिक कलहातूनच नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे.
याव्यतिरिक्त, पोलीस आणखी एका बाजूने तपास करत आहेत. पती भानू चंद्र रेड्डी यांना काही गंभीर आरोग्य समस्या होत्या का आणि त्या त्रासामुळे त्यांनी आधी आत्महत्या केली का, याचीही पडताळणी केली जात आहे. पतीने आत्महत्या केल्यानंतर मानसिक धक्का सहन न झाल्याने पत्नीनेही इमारतीवरुन उडी मारली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोथानूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. उच्चशिक्षित तरुण दाम्पत्याने अशा प्रकारे जीवन संपवल्यामुळे आयटी क्षेत्रात आणि त्यांच्या मूळ गावी शोककळा पसरली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.