Crime News: आधी पत्नीची हत्या, नंतर सासरच्या सहा जणांना संपवले! बंगळुरूमध्ये कॅबचालकाचा धक्कादायक कारनामा; पोलिसांकडून तपास सुरू

Bengaluru Family Murder Case: कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Bengaluru Family Murder Case
Bengaluru Family Murder CaseDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून एका कॅबचालकाने स्वतःच्या पत्नीची आणि सासरच्या कुटुंबातील अन्य सहा जणांची हत्या केल्याचा आरोप आहे. राजाजीनगर परिसरात घडलेल्या या सामूहिक हत्याकांडामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी इंदू शेखर याला अटक केली आहे. आरोपीने सात जणांची हत्या केल्याची कबुली दिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, पोलिसांना अद्याप सर्व मृतदेह सापडलेले नाहीत.

श्रीरामपुरा पोलीस ठाण्यात एका व्यक्तीच्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. चौकशीदरम्यान आरोपीच्या जबाबांमध्ये विसंगती आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता या भीषण हत्याकांडाचा उलगडा झाला. सध्या पोलिसांकडून उर्वरित मृतदेहांचा शोध घेतला जात असून, हत्येमागील नेमकी परिस्थिती तपासली जात आहे.

पत्नीशी वाद अन् सासरच्या मंडळींशी नाराजी

प्राथमिक तपासानुसार, आरोपी इंदू शेखर आणि त्याची पत्नी सुनीता यांच्यात वारंवार कौटुंबिक वाद होत होते. पत्नीच्या वागण्यावरून आरोपी नाराज होता. या वादांबाबत त्याने सासू आणि मेहुण्यांकडे तक्रार केली होती. मात्र, प्रत्येक वेळी सासरच्या मंडळींनी पत्नी सुनीताची बाजू घेतल्याने आरोपीचा राग वाढल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

याच रागातून त्याने पत्नी सुनीता आणि तिच्या कुटुंबातील सहा जणांना संपवल्याचा आरोप आहे. मृतांमध्ये पत्नी सुनीता, सासू रूपावती, मेहुणे शिवकुमार आणि शंकर, त्यांच्या पत्नी दिव्या आणि नलिनी तसेच शिवकुमारचा सात वर्षांचा मुलगा पुनीत यांचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Bengaluru Family Murder Case
Goa Water Crisis: साळावली धरणाशेजारीच पाण्यासाठी वणवण! ग्रामस्थांची व्यथा समोर येताच मानवाधिकार आयोगाची अधिकाऱ्यांना नोटीस

पार्टीच्या बहाण्याने मेहुण्यांना बोलावले

पोलिसांच्या प्राथमिक तपासात या हत्याकांडाचे नियोजन आधीच करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आरोपीने सर्वप्रथम पत्नीची हत्या केली. त्यानंतर आपल्या दोन्ही मेहुण्यांना पार्टीच्या बहाण्याने घरी बोलावले. ते आल्यानंतर त्यांचीही हत्या केल्याचा आरोप आहे. पुढे त्यांच्या पत्नी, स्वतःची सासू आणि सात वर्षांच्या मुलालाही लक्ष्य करण्यात आले.

हत्येसाठी आरोपीने सिलबट्ट्याचा म्हणजेच मसाला वाटण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दगडी साधनाचा वापर केला असावा, असा पोलिसांना संशय आहे. हत्येनंतर मृतदेह स्वतःच्या कारमधून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन टाकल्याची माहिती तपासात समोर आली आहे. याशिवाय घटनास्थळावरील रक्ताचे डाग पुसण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी रसायनांचा वापर केल्याचाही संशय आहे.

चार तासांच्या शोधमोहिमेनंतर सात वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी फेकल्याचा संशय आहे. पोलिसांनी चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे शोधमोहीम सुरू केली. नंदी हिल्सच्या पायथ्याशी सुमारे चार तास शोध घेतल्यानंतर सात वर्षांच्या पुनीतचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला.

मात्र, उर्वरित सहा जणांचे मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी शोधमोहीम अधिक तीव्र केली आहे. आरोपीने दिलेल्या माहितीची पडताळणी केली जात असून, मृतदेह नेमके कुठे टाकण्यात आले, याचा शोध घेतला जात आहे.

Bengaluru Family Murder Case
Goa Electoral Roll: मतदार यादीतून 6 जणांची नावे वगळणे बेकायदेशीर; उच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला दणका

बेपत्ता व्यक्तीच्या तक्रारीतून हत्याकांडाचा उलगडा

श्रीरामपुरा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या बेपत्ता व्यक्तीच्या तक्रारीनंतर या संपूर्ण प्रकरणाला सुरुवात झाली. तपासादरम्यान इंदू शेखरची चौकशी करण्यात आली. त्याने सुरुवातीला वेगवेगळी माहिती दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. अधिक चौकशीनंतर त्याने सात जणांच्या हत्येची कबुली दिल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, या हत्याकांडात आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता आहे. हत्येचे नेमके कारण, मृतदेहांची विल्हेवाट आणि पुरावे नष्ट करण्यासाठी वापरलेल्या साहित्याबाबत पोलीस तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.