

Assam Forest Official Stops Train Save Elephants: आसामच्या होजाई जिल्ह्यात वन विभागाच्या एका कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधान आणि सतर्कतेमुळे हत्तींच्या एका मोठ्या कळपाचा जीव वाचला असून, एक भीषण अपघात टळला. घनदाट जंगलातून निघालेला हत्तींचा कळप रेल्वे ट्रॅक ओलांडत असतानाच त्याच मार्गावरुन भरधाव वेगात राजधानी एक्सप्रेस येत होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तिथे तैनात असलेल्या वन कर्मचाऱ्याने क्षणाचाही विलंब न करता रेल्वेच्या दिशेने धाव घेत चालकाला थांबण्याचा इशारा केला. चालकानेही दाखवलेल्या सतर्कतेमुळे गाडी वेळेत थांबली आणि सर्व हत्ती सुरक्षितपणे जंगलाच्या दिशेने निघून गेले. या घटनेचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसते की, ट्रॅकच्या एका बाजूला वन कर्मचारी ट्रेन चालकाला इशारा करत आहे, तर दुसरीकडे पिल्लांसह हत्तींचा मोठा कळप अत्यंत शांततेने रेल्वे ट्रॅक पार करत आहे. जर कर्मचाऱ्याने वेळेवर इशारा दिला नसता किंवा चालकाने उशीर केला असता, तर अनेक मुक्या प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला असता. आसाममध्ये (Assam) अनेक ठिकाणी रेल्वे मार्ग हे हत्तींच्या कॉरिडोरमधून जात असल्याने असे अपघात होण्याचा धोका जास्त असतो, त्यामुळे वन विभाग या संवेदनशील भागात चोवीस तास नजर ठेवून असतो.
या घटनेची दखल खुद्द आसमचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली असून, त्यांनी आपल्या अधिकृत 'एक्स' अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे आणि भारतीय रेल्वेच्या सतर्कतेचे कौतुक करताना त्यांनी लिहिले की, अशा प्रकारच्या तत्परतेमुळेच प्राण्यांसाठी सुरक्षित मार्ग तयार करणे शक्य होत आहे आणि अनमोल जीव वाचत आहेत. सोशल मीडियावरही नेटकऱ्यांनी या कर्मचाऱ्याच्या सूझबुद्धीला सलाम करत, मानव आणि वन्यजीवांमधील सह अस्तित्वाची ही एक उत्तम मिसाल असल्याचे म्हटले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.