

Assam Floods Disaster Updates: देशभरात सध्या मान्सूनचा प्रभाव वेगाने वाढताना दिसत आहे. दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला असला, तरी अनेक राज्यांमध्ये हाच पाऊस भीषण आपत्ती ठरला आहे. ईशान्य भारतातील आसाम राज्याला मुसळधार पाऊस आणि नद्यांच्या वाढत्या पाण्यामुळे महापुराने वेढले आहे. आसाममधील अनेक गावे आणि नागरी भाग पूर्णपणे पाण्याखाली गेले असून लोकांची घरे अर्ध्याहून अधिक बुडाली आहेत.
राज्य सरकार आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, या विनाशकारी पुरामुळे आतापर्यंत 41 जणांना आपला जीव गमवावा लागला. तसेच राज्यातील 25 जिल्ह्यांमधील सुमारे 7 लाख 27 हजारांहून अधिक नागरिक या नैसर्गिक आपत्तीने गंभीररीत्या प्रभावित झाले आहेत.
पुराच्या (Floods) पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर बचावकार्य राबवले जात आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मदत आणि बचावकार्यासाठी भारतीय लष्कर, हवाई दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) तुकड्यांना तैनात करण्यात आल्या आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी चराईदेव आणि शिवसागर यांसारख्या अत्यंत प्रभावित जिल्ह्यांचा दौरा करुन पूरस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, यंदाच्या पुराचे मुख्य कारण म्हणजे शेजारील नागालँड राज्यातून आलेला पाण्याचा प्रचंड प्रवाह आणि सततचा पाऊस हे आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महापुरात सध्या 100 हून अधिक लोक गायब असून त्यांचा शोध सुरु आहे. त्यामुळे येत्या काळात मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पूरग्रस्तांसाठी ठिकठिकाणी तात्पुरते मदत छावणी केंद्र उभारण्यात आले असून औषधे आणि अन्नाचे वाटप केले जात आहे. मात्र, नद्यांच्या पाण्याच्या पातळीत होणारी वाढ आणि सततच्या पावसामुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत. एकंदरीत आसाममधील पूरस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.