
Jasprit Bumrah Wicket Celebration: भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा उत्कृष्ट कामगिरी करत क्रिकेट चाहत्यांचे मन जिंकले. सध्या या हाय होल्टेज सामन्यादरम्यान सर्वात जास्त चर्चा भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या अनोख्या सेलिब्रेशनची होत आहे. बुमराहने पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हारिस रौफला बोल्ड करुन पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर त्याच्याच स्टाईलमध्ये सेलिब्रेशन करुन बुमराहने दमदार उत्तर दिले.
दरम्यान, बुमराहने हारिस रौफची विकेट घेतल्यानंतर जो इशारा केला, त्याची सुरुवात सुपर-4 फेरीतील भारत-पाक सामन्यात रौफनेच केली होती. त्या सामन्यात भारताच्या डावादरम्यान रौफ बाउंड्रीजवळ क्षेत्ररक्षण करत होता. तेव्हा काही भारतीय चाहत्यांनी त्याला विराट कोहलीच्या नावाने चिडवण्याचा प्रयत्न केला. या चिडवण्याला उत्तर म्हणून रौफने प्रेक्षकांकडे पाहत फायटर जेट क्रॅश होण्याचा इशारा केला होता. हे वर्तन आक्षेपार्ह मानले गेले आणि या 'अभद्र' कृतीबद्दल आयसीसीने (ICC) रौफला नंतर 30 टक्के मॅच फीचा दंड ठोठावला.
या फायनल सामन्यात रौफला बुमराहने बोल्ड केले आणि लगेच त्याच्या आक्षेपार्ह वर्तनाचा हिशेब चुकता केला. बुमराहने रौफला बाद केल्यानंतर त्याच्याच अंदाजात सेलिब्रेशन करुन पाकिस्तानी चाहते आणि रौफलाही जोरदार प्रत्युत्तर दिले. बुमराहचा हा आत्मविश्वासपूर्ण आणि वेगळा अंदाज चाहत्यांना खूप आवडला आणि सोशल मीडियावर तो लगेच व्हायरल झाला.
फायनलमध्ये पहिल्यांदा फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तानी संघाला 12व्या षटकापर्यंत 113 धावांवर केवळ 1 गडी गमावून चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र, त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी सामन्यात जबरदस्त पुनरागमन केले. विशेषतः भारतीय फिरकी गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजीची पूर्णपणे धूळधाण उडवून दिली. शेवटच्या षटकात पाकिस्तानचा संपूर्ण संघ 146 धावांवर ऑल आऊट झाला. टीम इंडियासाठी सर्वाधिक 4 बळी कुलदीप यादवने घेतले. त्याचबरोबर जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले. विशेष म्हणजे, पाकिस्तानचे पहिले 8 फलंदाज भारतीय फिरकीपटूंनीच बाद केले, तर बुमराहने शेवटचे दोन महत्त्वपूर्ण बळी घेत पाकिस्तानचा डाव संपवला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.