Asaduddin Owaisi: ऑल इंडिया मजलिस ए इत्तिहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) पक्षाचे अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवैसी हे प्रवास करत असलेल्या रेल्वेवर अज्ञातांनी दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. गुजरातमधील सुरतला जात असताना ही घटना घडली आहे.
सोमवारी रात्री खा. असदुद्दीन ओवैसी हे गुजरातमधील सुरत येथे वंदे भारत एक्स्प्रेसमधून जात होते. यावेळी अज्ञातांनी या रेल्वेवर दगडफेक केली. सुदैवाने ओवैसी यांना काहीही दुखापत झाली नाही. तथापि, रेल्वेच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. सुरतपासून 20 ते 25 किलोमीटर अंतरावर ही घटना घडली.
रेल्वे प्रशासनाने या संपुर्ण प्रकाराची चौकशी करण्याचे ठरवले आहे, पण आता या मुद्याला राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे. एआयएमआयएम पक्षाचे प्रवक्ता वारिस पठाण यांनी, असदुद्दीन ओवैसी यांना रोखण्यासाठी ही दगडफेक जाणीवपुर्वक केल्याच आरोप केला आहे.
वारिस पठाण यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ओवैसी आणि पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य अहमदाबादहून सुरत येथे वंदे भारत एक्स्प्रेसने जात होते. तेव्हा काही लोकांनी रेल्वेवर दगडफेक केली. याच रेल्वेची काच फुटली आहे. ओवैसी ज्या डब्ब्यातून प्रवास करत होते, त्याच डब्याची काच फुटली आहे. मोदीजी तुम्ही कितीही दगडफेक करा, आमचा हक्कासाठीचा आवाज थांबणार नाही.
रेल्वेचे स्पष्टीकरण
पश्चिम रेल्वेच्या बडोदा जीआरपीने या घटनेबाबत स्पष्टीकरण दिले आहे. दगडफेकीचा प्रकार घडला नव्हता, तर ट्रेनची गती अधिक असल्याने काही दगड उडून रेल्वेची काच फुटली आहे, असे रेल्वेने म्हटले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.