

भारतीय महिला क्रिकेट संघाने मायभूमीत यंदाचा विश्वचषक जिंकला आणि संपूर्ण देश आनंदात नाहून निघाला! या ऐतिहासिक विजयाच्या क्षणी कॅमेऱ्यांचा प्रकाश जरी खेळाडूंवर झळकला, तरी त्यामागे शांतपणे उभा असलेला एक चेहरा होता; त्याचे नाव आहे अमोल मुजुमदार. त्यांची कहाणी ही संघर्ष, संयम आणि पुनरागमनाची अद्भुत गाथा आहे.
१९८८मध्ये अमोल फक्त १३ वर्षांचा होता. मुंबईतील प्रतिष्ठित हॅरिस शिल्ड शालेय स्पर्धेत तो नेट्समध्ये बॅटिंगची वाट पाहत होता. त्याच दिवशी त्याच्याच संघातील सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी ६६४ धावांची विक्रमी भागीदारी केली होती.
ही भागीदारी संपूर्ण जगाला कळली आणि दोघेही घराघरांत पोहोचले. या सामन्यासाठी पॅड बांधून बसलेला अमोल मात्र तसाच घरी परतला. त्याला फलंदाजीची संधीच मिळाली नाही. भविष्यात संधी मिळेल, या आशेने आणि विश्वासाने तो खेळत राहिला.
१९९३मध्ये बॉम्बे (आताची मुंबई) संघाकडून पदार्पण करताना अमोलने पहिल्याच सामन्यात २६० धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. जगभरात कोणत्याही खेळाडूच्या पदार्पणातील हा सर्वाधिक स्कोअर होता.
तेव्हा लोक म्हणाले होते, की ‘हा पुढचा सचिन आहे.’ पण त्यानंतरच्या काळात भारतीय संघात तेंडुलकर, द्रविड, गांगुली, लक्ष्मण असे ‘तारे’ झळकत होते. मुजुमदारचे ‘तेज’ त्या चांदण्यांच्या आकाशात हरवून गेले. तो प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत राहिला.
संपूर्ण दोन दशकांच्या कारकिर्दीत अमोलने ११ हजारांहून अधिक प्रथम श्रेणी धावा, ३० शतके ठोकली; पण भारतासाठी तो एकही सामना खेळू शकला नाही.
आपणास संधी का मिळाली नाही, याबाबत त्याने कधीही जाहीर वाच्यता केली नाही. ‘खेळ सोडू नकोस; तुझ्यात अजून क्रिकेट जिवंत आहे,’ असे वडील अनिल मुजुमदारांचे वाक्य अमोलच्या कानी सतत घुमायचे.
या एका वाक्यामुळे त्याला नवसंजीवनी मिळाली. २००६मध्ये त्याने मुंबईला रणजी ट्रॉफी जिंकवून दिली आणि एका तरुण खेळाडूला (रोहित शर्मा) पहिल्यांदा फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये संधी दिली, जो आज भारतीय संघाच्या यशस्वी कर्णधारांमधील एक गणला गेला. ‘हिरे’ शोधण्याची कला त्याच्यात त्याचवेळी दिसून आली.
२०१४मध्ये खेळाला निरोप देऊन अमोलने कोचिंगचा मार्ग स्वीकारला. वर्षानुवर्षे इतरांना घडवत राहिला आणि अखेर २०२५मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने त्याच्या मार्गदर्शनाखाली विश्वचषकाचे स्वप्न साकार केले. ज्या ट्रॉफीला त्याने खेळाडू म्हणून कधी स्पर्शही केला नव्हता, तीच ट्रॉफी आज त्याच्या संघाने उचलली.
या चषकाचे चुंबन घेताना त्याचे डोळे पाणावले. अख्खी कारकीर्द त्याच्या डोळ्यांसमोरून गेली. काही सेकंद श्वास थांबवून त्याने सुखाची अनुभूती घेतली. कधी कधी जीवनात संधी मिळत नाही; पण ती इतरांना मिळवून देऊ शकतो. अमोलने स्वतःच्या अपूर्ण स्वप्नांतून इतरांचे स्वप्न फुलवले. यापेक्षा मोठा आनंद तरी काय...
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.