
The Taj Story Controversy: ज्येष्ठ अभिनेते परेश रावल गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहेत. नुकताच 'हेरा फेरी 3' मधून अक्षय कुमारसोबत झालेल्या वादामुळे ते चर्चेत होते. आता मात्र ते त्यांच्या आगामी 'द ताज स्टोरी' (The Taj Story) या चित्रपटामुळे एका नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या चित्रपटाच्या मोशन पोस्टरने सोशल मीडियावर मोठा वादंग निर्माण केला आहे.
परेश रावल (Paresh Rawal) यांनी 29 सप्टेंबर रोजी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर 'द ताज स्टोरी' या चित्रपटाचा मोशन पोस्टर शेअर केला होता. हे पोस्टर पाहून अनेक यूजर्संनी धार्मिक भावना दुखावल्याच्या आणि देशात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. या पोस्टरमध्ये परेश रावल हे ताज महालाच्या वरचा घुमट उचलून बाजूला ठेवताना दिसत आहेत आणि त्या घुमटाखालून भगवान शिव (Lord Shiva) बाहेर येत असल्याचे दृश्य दर्शवण्यात आले आहे. याच दृश्यामुळे मोठा धार्मिक वाद निर्माण झाला आहे. ताजमहालच्या आत शिवमंदिर असल्याच्या विवादाला हवा देण्याचा हा प्रयत्न असल्याचे अनेकांनी म्हटले.
मोशन पोस्टर पाहिल्यानंतर अनेक यूजर्संनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेक नेटकाऱ्यांनी 'ओएमजी' (OMG) चित्रपटाचा हवाला देत परेश रावल यांच्याकडून अशा कृत्याची अपेक्षा नव्हती, असे म्हटले.
एका यूजरने संताप व्यक्त करत लिहिले की, "हे काय मूर्खपणाचे काम सुरु आहे?"
एकाने थेट आरोप केला की, "हे लोक देशात अशांतात (Unrest) पसरवत आहेत."
तर एका चाहत्याने भावनिक होत लिहिले, "सर, तुमच्याबद्दल खूप आदर होता, पण तुम्ही हे केवळ काही पैशांसाठी काय करत आहात."
अनेक यूजर्संनी कमेंट्समध्ये धार्मिक भावना दुखावल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.
वाद वाढत असल्याचे पाहून परेश रावल यांनी आपल्या 'एक्स' अकाउंटवरुन चित्रपटाच्या निर्मात्यांचे स्पष्टीकरण पोस्ट केले. स्वर्णिम ग्लोबल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या निर्मात्यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले की, 'द ताज स्टोरी' चे निर्माते स्पष्ट करु इच्छितात की, हा चित्रपट कोणत्याही धार्मिक वादाशी जोडलेला नाही. तसेच 'ताज महलच्या आत भगवान शिव वास करतात' असा कोणताही दावा चित्रपट करत नाही. हा चित्रपट केवळ आणि केवळ ऐतिहासिक तथ्यांवर आधारित आहे. आम्ही दर्शकांना विनंती करतो की, चित्रपट पाहण्यापूर्वी कोणत्याही प्रकारचे मत बनवू नका. धन्यवाद."
चित्रपटाच्या (Movie) निर्मात्यांनी हे स्पष्टीकरण दिले असले तरी, यूजर्सचा संताप कमी झालेला नाही. उलट, अनेक नेटकाऱ्यांनी हे स्पष्टीकरण केवळ सारवासारव करण्यासाठी दिले असून चित्रपट निर्मात्यांवर धार्मिक भावनांना दुखावल्याचा आरोप करत आपला रोष कायम ठेवला. त्यामुळे, 'द ताज स्टोरी' या चित्रपटाभोवतीचा वाद अजूनही शमलेला नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.