

Blinkit Delivery Boy Video: राजकारण्यांना आपण सहसा पांढऱ्या शुभ्र कपड्यात, संसदेत भाषणे देताना किंवा भव्य सभांना संबोधित करताना पाहतो. परंतु, आम आदमी पार्टीचे नेते आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांचा एक अत्यंत वेगळा आणि 'मानवी' चेहरा नुकताच जगासमोर आला. राघव चड्ढा चक्क एका 'डिलिव्हरी बॉय'च्या गणवेशात दिल्लीच्या गल्ल्यांमध्ये पार्सल पोहोचवताना दिसल्याने सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. राजकारणातील ग्लॅमर बाजूला सारुन त्यांनी घेतलेल्या या 'ग्राउंड रिॲलिटी' अनुभवाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सोमवारी (12 जानेवारी) सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला, ज्यामध्ये राघव चड्ढा यांनी प्रसिद्ध क्विक-कॉमर्स कंपनी 'ब्लिंकिट' (Blinkit) चा निळा टी-शर्ट घातला होता. पाठीवर डिलिव्हरी बॅग, डोक्यावर हेल्मेट आणि हातात मोबाईल घेऊन ते एका खऱ्या डिलिव्हरी बॉयसोबत स्कूटीवर बसून सामान पोहोचवण्यासाठी निघाले होते. केवळ फोटो काढण्यासाठी न थांबता, त्यांनी प्रत्यक्ष ग्राहकांच्या दारापर्यंत जाऊन ऑर्डर पोहोचवल्या.
एका हाय-प्रोफाईल नेत्याला आपल्या दारात डिलिव्हरी देताना पाहून अनेक लोक थक्क झाले. राघव चड्ढा यांनी हा अनुभव केवळ एक 'स्टंट' म्हणून नाही, तर या क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो तरुणांच्या समस्या समजून घेण्यासाठी घेतला होता.
हा व्हिडिओ शेअर करताना राघव चड्ढा यांनी अत्यंत भावूक पोस्ट लिहिली. ते म्हणाले की, "नेहमी वातानुकूलित खोल्यांमध्ये बसून धोरणे ठरवण्यापेक्षा, प्रत्यक्ष जमिनीवर उतरुन काम करणाऱ्या कष्टकऱ्यांचे आयुष्य अनुभवणे गरजेचे असते." डिलिव्हरी पार्टनर्संना रोज किती उन्हाचा, ट्रॅफिकचा आणि वेळेच्या दडपणाचा सामना करावा लागतो, हे जवळून पाहण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले. त्यांनी संपूर्ण दिवस एका डिलिव्हरी बॉयप्रमाणे व्यतीत केला. रस्ते शोधणे, वेळेत पोहोचण्याचे दडपण आणि ग्राहकांचे समाधान या सर्व गोष्टी त्यांनी स्वतः अनुभवल्या. त्यांच्या या 'मानवीय' अंदाजाने इंटरनेटवर लोकांची मने जिंकली आहेत.
राघव चड्ढा हे पहिल्यापासूनच डिलिव्हरी बॉईजच्या सुरक्षिततेबाबत आग्रही राहिले आहेत. यापूर्वी त्यांनी राज्यसभेत कंपन्यांच्या '10 मिनिटांत डिलिव्हरी' देण्याच्या धोरणावर कडाडून टीका केली होती. त्यांचा असा ठाम विश्वास आहे की, अवघ्या 10 मिनिटांत सामान पोहोचवण्याच्या नादात हे डिलिव्हरी पार्टनर्स जीवावर उदार होऊन वेगाने गाड्या चालवतात. यामुळे रस्ते अपघातांचा (Accident) धोका वाढतो आणि या तरुणांचा जीव धोक्यात येतो. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा हे अधोरेखित केले की, जलद सेवा देण्याच्या स्पर्धेत आपण मानवी जीवनाचे मूल्य विसरता कामा नये.
राघव चड्ढा यांचा हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला असून त्यावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. सोशल मीडिया वापरकर्ते त्यांच्या या प्रयत्नाचे मनमोकळेपणाने स्वागत करत आहेत. एका युजरने लिहिले की, "राघव चड्ढांना मानाचा मुजरा! जे नेते जमिनीवर उतरुन लोकांचे प्रश्न समजून घेतात, तेच खरे लोकनेते असतात." दुसऱ्या एका युजरने म्हटले की, "एखाद्याची व्यथा समजून घ्यायची असेल, तर त्याच्या जागी उभे राहून पाहावे लागते, राघव यांनी तेच केले."
राघव चड्ढा यांच्या या कृतीमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे की, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेत्यांनी एसी कार्यालयाबाहेर पडणे किती गरजेचे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.