

केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या नजरा सध्या 8व्या केंद्रीय वेतन आयोगाकडे (8th Pay Commission) लागल्या आहेत. आयोगाची स्थापना होऊन सात महिन्यांहून अधिक कालावधी उलटला असला, तरी सुधारित वेतन संरचना आणि फिटमेंट फॅक्टरबाबत अद्याप कोणतीही अंतिम घोषणा झालेली नाही. त्यामुळे वाढीव वेतन नेमके कधी मिळणार, याबाबतची उत्सुकता कायम आहे. दरम्यान, केंद्र सरकारने संसदेत यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.
केंद्र सरकारने 3 नोव्हेंबर 2025 रोजी 8व्या वेतन आयोगाची स्थापना केली होती. वित्त मंत्रालयाने राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार, आयोगाला स्थापना झाल्यापासून 18 महिन्यांच्या आत शिफारसी सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीनुसार आयोगाचा अंतिम अहवाल मे 2027 च्या आसपास सादर होण्याची शक्यता आहे. मात्र, आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर लगेचच सुधारित वेतन लागू होईल, असे नाही.
वित्त मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, वेतन आयोगाच्या शिफारसी आल्यानंतर केंद्र सरकार त्यांचा सविस्तर अभ्यास करेल. त्यानंतर त्या शिफारसी जशाच्या तशा स्वीकारायच्या की काही बदलांसह मंजूर करायच्या, याचा निर्णय घेतला जाईल. सरकारची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन आणि त्यानुसार मिळणारे लाभ लागू होतील. यामुळे कर्मचाऱ्यांनी अहवाल सादर झाल्यानंतरही काही काळ प्रतीक्षा करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सरकारने स्पष्ट केले आहे की, 8व्या वेतन आयोगाला स्वतंत्रपणे काम करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. आयोगाने आपल्या कामाच्या प्रगतीची किंवा चर्चेतील प्रस्तावांची नियमित माहिती सरकारला देणे बंधनकारक नाही. त्यामुळे आयोगाच्या बैठका, कर्मचारी संघटनांशी झालेल्या चर्चा किंवा आतापर्यंतच्या प्रस्तावांबाबत सरकारकडे तपशील उपलब्ध नसल्याचे वित्त मंत्रालयाने सांगितले. तथापि, आयोग विविध शहरांमध्ये कर्मचारी संघटना आणि संबंधित घटकांशी चर्चा करत असून, पुढील टप्प्यातही सल्लामसलत सुरू राहणार आहे.
कर्मचारी संघटनांनी आयोगाकडे किमान मूलभूत वेतन, महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), निवृत्तीवेतन आणि इतर भत्त्यांबाबत विविध मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये फिटमेंट फॅक्टर 3.8 करण्याची मागणी सर्वाधिक चर्चेत आहे.
फिटमेंट फॅक्टर हा विद्यमान मूलभूत वेतनाचे नव्या वेतन संरचनेत रूपांतर करण्यासाठी वापरला जाणारा महत्त्वाचा घटक आहे. सध्या 7व्या वेतन आयोगानुसार तो 2.57 आहे. जर भविष्यात तो वाढविण्यात आला, तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूलभूत वेतनात मोठी वाढ होऊ शकते. मात्र, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही.
सध्या 8व्या वेतन आयोगाचे काम सुरू असून, सुधारित वेतनाबाबत कोणताही अंतिम निर्णय जाहीर झालेला नाही. त्यामुळे फिटमेंट फॅक्टर, नवीन वेतन संरचना किंवा पगारवाढीबाबत सुरू असलेल्या चर्चांकडे अधिकृत घोषणा होईपर्यंत अंदाज म्हणूनच पाहणे आवश्यक आहे. आयोगाचा अहवाल आणि त्यानंतर केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव वेतनाबाबत स्पष्ट चित्र समोर येईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.